विधानपरिषदेत आ.सुरेश धस यांची मागणी;जिल्हा विकास निधीतून अंगणवाडी बांधकाम व दुरूस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा
क्लिक2आष्टी अपडेट-ग्रामीण भागातील महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्य विषयक योजना तसेच संतुलित पोषण आहार आणि शिक्षण विषयक बाबी यासाठी अंगणवाडी हे अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र असून या अंगणवाडी बांधकामासाठी आणि अंगणवाडी दुरुस्तीसाठी जिल्हा विकास निधीतून पुरेसा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आ.सुरेश धस यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की,अंगणवाडी हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून या ठिकाणी शून्य ते सहा वर्षीय बालकांसाठी आणि महिलांसाठी आरोग्य,पोषण आणि शिक्षण विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी होत असते त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अंगणवाडी स्वतःच्या मालकीच्या जागेत नसून अनेक ठिकाणी बांधकामे करणे प्रस्तावित आहे तर अनेक ठिकाणी अंगणवाड्या बांधकामासाठी आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे,अंगणवाड्यांची दुरावस्था असल्याने बालकांचे आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे जिल्हा नियोजन व विकास निधीतून केवळ ३ टक्के निधी खर्च करण्यास परवानगी असल्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे अंगणवाड्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी १० टक्के पर्यंत निधी उपलब्ध व्हावा यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी अर्थ विभागाकडे विनंती केली आहे काय ? असा प्रश्न विचारून त्यांनी अंगणवाडी बांधकाम आणि दुरुस्तीसाठी निधीबाबत प्रश्न विचारला असता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की,३ टक्के राखीव या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन मध्ये अंगणवाडी बांधकाम आणि अंगणवाडी दुरुस्तीसाठी जे अर्थशीर्ष आहे तो त्यांनी कार्यरत ठेवावा अशी विनंती आमच्या विभागाने अर्थ विभागाकडे केलेली आहे आणि त्यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल असे सांगण्यात आल्याचे आ.सुरेश धस यांनी शेवटी सांगितल.