आष्टी येथे राजस्थान मधील “कोटा पद्धतीचा शैक्षणिक अभ्यासक्रम” सुरू करणार-किशोरनाना हंबर्डे
ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सुनील पोपळे,अनिरुद्ध धर्माधिकारी, सय्यद बबलू,संतोष सानप,प्रवीण पोकळे,अविनाश कदम या सात पत्रकारांचा सन्मान संपन्न
आष्टी(प्रतिनिधी)-आपल्या ग्रामीण भागातील अभ्यास विद्यार्थ्यांना लातूरसारख्या शहरात जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा आष्टी येथे राजस्थान मधील “कोटा पद्धतीचा शैक्षणिक अभ्यासक्रम”सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचे हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि.किशोरनाना हंबर्डे यांनी केले.
आष्टी शहरातील बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आणि
“भाऊ फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी बीड जि.प.चे माजी सदस्य डाॕ.मधुकर हंबर्डे हे होते.व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक व्ही.एल.शिंदे,सचिव अतुलशेठ मेहेर,
संचालक बाळासाहेब वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सुभान पठाण,प्रा.महेश चौरे,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,उपप्राचार्य बाबासाहेब मुटकुळे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना किशोरनाना हंबर्डे म्हणाले की,मी संस्थेचा अध्यक्ष झाल्यापासून महाविद्यालयाने विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.कला आणि वाणिज्य हे दोनच विभाग अनुदानित असून विज्ञान विभाग हा अनुदानित नसला तरीही आपण आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण करून दिलेली आहे.त्याचा लाभ तालुक्यातील आणि इतर भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे.दुष्काळी १९७२ साली आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली.या संस्थेतून हजारो विद्यार्थी घडले आहेत आणि महाराष्ट्रभर विविध ठिकाणी उत्तम काम करत आहेत.या महाविद्यालयाला “नँक” समितीचा अ दर्जा मिळालेला असून आता अ अधिक अधिक A + + हा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.संस्थेचा कारभार आणि उपक्रम साजरे करताना राजकारणा विरहित उपक्रम राबवले जातात.मागील वर्षी दर्पण दिनानिमित्त पेशाने शिक्षक असलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे यावर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सुनील पोपळे,सकाळचे अनिरुद्ध धर्माधिकारी,तेजवार्ताचे सय्यद बबलू,लोकाशाचे संतोष सानप,प्रजापत्रचे प्रवीण पोकळे,लोकमतचे अविनाश कदम या सात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे. ही परंपरा यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे किशोरनाना हंबर्डे यांनी यावेळी सांगीतले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने याच वर्षातील दर्पण दिनानिमित्त संतोष दाणी,राजेंद्र लाड,बा.म.पवार,जावेद पठाण,शरद तळेकर या पाच पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता.दर्पणदिनाची परंपरा कायम ठेवून संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांंच्या वाढदिवसानिमित्त या सात पत्रकारांच्या सत्काराची परंपरा नव्याने पुढे येत आहे. वाढदिवसानिमित्त रक्तदान,
अनाथालयात अन्नदान,वृक्षारोपन ईतर उपक्रम राबविण्यात आले.पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि महाविद्यालयामध्ये नवनवीन दर्जेदार उपक्रम राबवण्याचा निर्धार असून “लातूर पॅटर्न” हा “कोटा” पद्धतीचा अभ्यासक्रम करवून घेणे असा आहे. त्याचप्रमाणेच यंदा संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमीलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी संस्थेला यथाशक्ती मदत करण्याचे आवाहनही हंबर्डे यांनी केले.