व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

काळ्या बाजारात जाणारा तांदूळ नगरमध्ये पकडला;बीडच्या तिघांवर गुन्हा दाखल

0

आष्टी-गुजरातला पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील रेशनचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात नेत असताना रविवारी (दि.१३) नगर तालुक्यातील खोसपुरी (पांढरीपुल) येथे पकडण्यात आले.हे धान्य ३३ टन असून, त्याची किंमत अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये आहे.पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.याप्रकरणी बीड जिल्ह्यातील अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे,ता.पाटोदा,जि.बीड),सुनील कठाळे (रा.दहीवडी,ता.शिरुर कासार,जि.बीड),गोकुळ महादेव जाधव (रा. आर्वी,ता.शिरुर कासार,जि. बीड) तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,ट्रकसह सुमारे ३१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत नगर तालुका पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीत म्हटले की,अंमळनेर (ता.पाटोदा,जि.बीड) येथील रेशनिंगचे धान्य नगर- औरंगाबादमार्गे गुजरातच्या काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी,पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर यांना मिळाली होती. कारवाईचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार दत्तात्रय भावले, पुरवठा निरीक्षक राजेंद्र राऊत,पुरवठा निरीक्षक शिवराज पवार हे सर्वजण जमा झाले.पहाटे ५ वाजता ते खोसपुरी (ता.नगर) येथे पोहोचले.सुमारे साडेपाच वाजता बीडकडून एक ट्रक (क्र.एम.एच.२३,ए.यु. ७९२१) येताना दिसला.हा ट्रक थांबवून त्यातील मालाची तपासणी केली असता त्यात तांदूळ आढळून आला. ट्रकमधील तांदूळ पाहिल्यानंतर या धान्याचे मूळ कागदपत्र चालकाकडे मागितले,परंतु त्याच्याकडे या धान्याचे कोणतेही कागदपत्र नव्हते.रेशनचा तांदूळ दुसया पांढ-या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ट्रकमधून बेकायदा वाहतूक केली जात होती.त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला व त्यांनी वाहनासह तांदूळ जप्त केला.हा जप्त केलेला तांदूळ सुमारे ३३ टन असून, त्यांची अंदाजित किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे,ता.पाटोदा,जि.बीड),सुनील कठाळे (रा.दहीवंडी,ता.शिरुर कासार,जि.बीड),गोकुळ महादेव जाधव (रा.आर्वी,ता.शिरुर कासार,जि.बीड)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाठक हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.