व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत पुन्हा दूध भेसळ माफीयांनी मुंडकेवर काढले

दुधाची गुणवत्ता वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीनशे गोण्या पावडर केली जप्त

0

click2ashti update-तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली.तसेच दुध भेसळ करणाऱ्यांची यापुढे जिल्ह्यात गय केली जाणार नाही असा इशाराही बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दुध भेसळ माफिया यांना दिला आहे.


आष्टी तालुक्यातील आष्टी तालुक्यातील कडा महामार्गावरील टाकळी अमिया फाटा येथे जिल्हाधिकारी अविनाश पाठक व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आष्टी पोलिसांनी आज दि.४ रविवारी रोजी पहाटे छापा मारला.या ठिकाणी असलेल्या एका गोदामात पथकाला दुधासाठी गुणवत्ता वाढविण्यासाठी लागणाऱ्या पावडरच्या एक दोन नव्हे तर जवळपास ३०० गोण्या आढळून आल्या.याची अंदाजे किंमत बारा लाख रुपयांच्या जवळपास आहे.यावेळी कडा पोलिस चौकी येथे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले,गोपनिय माहितीच्या आधारे आष्टी तालुक्यातील कडा येथे अंबादास पांडुरंग चौधरी यांचे साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोदामात अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी छापा मारला.या ठिकाणी दुध पावडरचा मोठा साठा आढळून आला.तसेच टाकळी अमिया येथेही एका दूध संघावर छापा मारला असून येथेही पावडरचा साठा सापडला आहे.अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे,अनुराधा भोसले,सहाय्यक आयुक्त कांबळे,आष्टीचे स.पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे ,विजय नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे आदींनी ही कारवाई केली.गेल्या दहा तासापासून कारवाई सुरू असून सदरील वृत्त लिहीपर्यंत ही कारवाई सुरूच होती त्यामुळे कोणते कलम लावले याची माहिती अद्यापही माध्यमांना या अधिकाऱ्यांनी दिली नाही.


छापा टाकला आता पण पुढे काय?
अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळ होत असल्याच्या संशयावरून एखाद्या दुकानावर,दुध संघावर छापा टाकतात.मात्र,एक छापा टाकला तरी त्याच्या तपासणीचे नमुने लवकर प्राप्त होत नाहीत,त्या कारवाईचे पुढे काय होते,हे नागरिकांना समजत नाही. मात्र,अशी कारवाई झाली की संबंधीत भेसळीवाले साहेबांचे हात ओले करतात,त्यानंतर कारवाईला विश्रांती मिळते,फार्स नको तर प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
दुधसंस्थाच नाही तर किराणा दुकानांवरही छापे मारा
आष्टी तालुक्यात काही छोट्या व्यापारी वर्गाबरोबर तेल आणि दूध विक्रीत काही बडे व्यापारी गुंतले आहेत.या साखळीत अगदी हुबेहूब दिसणारे तेल आणि दूध बनविण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर होत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे प्रामुख्याने तेल आणि दूधाचे तालुक्यातील विविध ठिकाणचे नमुने तपासण्याची गरज आहे.
नगर जिल्ह्याशी लागेबांधे

भेसळ दुध प्रकरणासाठी लागणारे साहित्य शेजारील नगर जिल्ह्यातून पुरवठा होत असून,तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुध भेसळ होत असून,अन्न भेसळ प्रशासनाने या प्रकरणी धडक मोहिम सुरू करण्याची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

गुणवत्ता वाढविण्यासाठी या दूध पावडरचा उपयोग
मध्यंतरी दुधाचे दर पडल्यानंतर राज्य शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी 3.2 फॅट व ८.३ एसएनएफ असे गुणवत्तेचे प्रमाण ठेवले आहे. कमी प्रतीच्या दुधास शासन अनुदान देत नाही .त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी या दूध पावडरचा उपयोग केला जातो.
दुधाचे घेतलेल्या नमूण्याचे रिपोर्ट मात्र येत नाहीत
बीड जिल्ह्यासह नगर,संभाजीनगर,आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे.मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु कठोर शिक्षा होत नाही.बीड जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होते,मात्र दुधात भेसळ देखील याच तालुक्यात होत असल्याचे अनेकवेळा समोर आले छापेही टाकले पण दुधाचे घेतलेल्या नमूण्याचे रिपोर्ट मात्र येतच नाहीत.
१ हजार लीटरमध्ये ३०० लीटर भेसळीचे दूध
तज्ञांच्या माहिनुसार दूध संकलन केंद्राचे प्रत्येकी ७०० ते ७५० लीटर शेतकऱ्यांकडील संकलन असेल तर यामध्ये व्हे पावडरपासून तयार केलेले २५० ते ३०० लीटर भेसळयुक्त दूध टाकून प्रत्येकी १ हजार लीटर दुधाचे विक्री करत होते.हे भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.