जागतिक फोटोग्राफी दिन विशेष-आष्टीचे फोटोग्राफर सचिन रानडेंनी कलेप्रती आदर म्हणून घरावरच साकारला कॅमेरा
click2ashti update-ज्या क्षेत्रात आपण काम करतो ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते मग तो व्यवसाय असो वा नोकरी अथवा कलाकार क्षेत्र प्रत्येकाला त्या क्षेत्राचा अभिमान असतोच परंतु तो अभिमान शब्दातूनच अधिक प्रमाणात व्यक्त केला जातो मात्र जी कला अंगीकृत केली नंतर ती व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी ठरल्यावर तिच्या प्रती ऋण व्यक्त करताना त्या कलेला प्रत्यक्षात आपल्या घराच्या प्रतिकृतीतून जगासमोर मांडणं ही गोष्ट कौतुकास्पद आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरते.आणि हेच काम आष्टीचे फोटोग्राफर सचिन रानडेंनी कलेप्रती आदर म्हणून आपल्या नवीन बांधलेल्या घरावर कॅमेराची प्रतिकृती साकारून केले आहे.

आष्टी येथील फोटोग्राफर सचिन रानडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेल्या 17 वर्षांपासून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला.या व्यवसायातून इमानदारीने काम करत आष्टी शहरासह संपूर्ण तालुक्यात आपल्या कलेची चूनुक दाखवत आठवणीत राहतील असे काही छायाचित्र टिपले शिवाय या कलेच्या माध्यमातून आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे काम केले.रोल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आधुनिक काळातील डिजिटल कॅमेरा कडे वळला आहे.काळानुरूप व्यवसायातील बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक साधनसामुग्री त्याच्याकडे आहे.काही वर्ष अनेक वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणूनही सचिन रानडे यांनी काम केल आहे.त्यामुळे सचिन रानडे यांची ओळख आणखी मोठ्या प्रमाणात झाली.
कॅमेऱ्याने आयुष्याला दिशा दिली
परिस्थितीने सर्व बाजूंनी ग्रासल्यानंतर मला काहीतरी मार्ग शोधणे क्रमप्राप्त होते.कुठलाही रोजगार नव्हता साहजिकच ऐन तरुण वयात दिशा मिळणे कठीण होते.मात्र अशा वेळी मला फोटोग्राफर व्हावंसं वाटलं.कारण त्या वेळी रोल कॅमेरे होते.रोल कॅमेरावर परिपूर्ण शिक्षण होतंय तोच डिजिटल कॅमेऱ्याने या क्षेत्रात पदार्पण केले.आणि मग तिथूनच मग माझी यशस्वी वाटचाल सुरू झाली आष्टीकरांनी या व्यवसायात मला खूप मदत केली. व्यवसाय म्हणून न बघता मी याकडे एक कलाकार म्हणून पाहतो.म्हणूनच ज्या कॅमेराने माझ्या आयुष्याला उभारी दिली आणि माझ्या आयुष्याला दिशा दाखवण्याचे काम केले.त्या कलेप्रती कुठेतरी ऋण फेडता येतील का? हा प्रश्न होता.मात्र घर बांधकाम केले आणि त्याच वेळी ठरवलं की आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या लक्ष्मीला आपल्या घरावर प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारायचे असे ठरवले आणि मी माझ्या घरावर कॅमेराची प्रतिकृती साकारली.
–सचिन रानडे,फोटोग्राफर आष्टी