आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार;सहा गावातील ४४ लोक अडकले,आमदार सुरेश धस यांनी हेलिकॉप्टर घेतले मागवून
आष्टी-तालुक्यामधील कडा गावामध्ये ११ लोक, चोभा निमगाव मध्ये १४ लोक,घाटा पिंपरी ७ लोक,पिंपरखेड ६ लोक,धानोरा मध्ये ३ आणि डोंगरगण मध्ये ३ असे लोक अडकलेले आहेत.एकूण सहा गावात ४४ लोकं अडकलेली आहेत. जिल्हाधिकारी,बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार,नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे.तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी पाठपुरवठा करत नाशिक वरून हॅलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे पुणे येथुन एनडीआरएफची टिम आष्टी येथे पाठविण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून झालेल्या उतरा नक्षत्रामधील मुसळधार पावसाने तालुक्यातील दौलावडगांव, धानोरा,धामणगाव, पिंपळा,कडा,या पट्टय़ात सोमवारी पहाटे अक्षरशःपाच-सहाच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृष्य पाऊस झाला.खरीप हंगामातील सोयाबीन सह उडीद,मूग,तूर,ऊस पीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने या परिसरातील शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पहाणी करणाऱ्या शेतक-यांनी सांगितले आहे.दरम्यान रात्रभर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील कडी,कांबळी,देविनिमगांव,नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी तालुक्यातील बऱ्याच गावचा जनसंपर्क तसेच दळणवळण व्यवस्था खोळंबलेली दिसून येत होती.
देविनिमगांवचा पुल गेला वाहून
कडा-धामणगाव रस्त्यावरील देविनिमगाव येथे नव्याने बनविण्यात आलेला पुल या अतिवृष्टीच्या पावसाने वाहून गेल्याने हा मार्ग बंद पडला आहे.
जयदत्त धस,तहसिलदार,कृषी अधिकारी यांनी पाहणी करत आ.धस यांना दिला आढावा
दरम्यान अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील दौलावडगाव,धामणगाव,कडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पिकांचे,घराचे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सकाळी ८ वा.जयदत्त धस व तहसिलदार वैशाली पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्या आदिंनी पाहणी करत नागरीक शेतक-यांच्या व्यथा जाणून घेत या सर्व परिस्थितीचा आढावा आमदार सुरेश धस यांना दिला.