भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ११ नोव्हेंबरला होणार प्रवेश !
प्रमुख कार्यकर्त्यांसह मुंबईतील राष्ट्रवादी भवनात ना.अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर का.मतदार संघाचे भाग्यविधाते तथा शिक्षण महर्षी,माजी आ.भीमराव धोंडे यांचा प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्ष ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रवेश होणार आहे.मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या पक्ष प्रवेश सोहळ्याची बीड जिल्ह्यासह राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

या पक्षप्रवेशामुळे राजकारणातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत.त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर भविष्यातील निवडणुकांमध्ये फार मोठा परिणाम या निमित्ताने पाहायला मिळेल असा अंदाज राजकीय जाणकारांकडुन व्यक्त होत आहे.माजी आ.भीमराव धोंडे हे गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ सक्रिय राजकीय नेते म्हणून राजकारणात आहेत.राजकारण करताना त्यांनी समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन विकासाच्या अनेक संकल्पना आष्टी,पाटोदा,शिरूर का.विधानसभा मतदार संघामध्ये राबवल्या.विविध शैक्षणिक संस्था,आरोग्य क्षेत्रातील विविध महाविद्यालय युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन,भव्य व्यायाम शाळा, कृषी महाविद्यालय सुरु केले आहे. शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यासाठी सध्या संघर्ष उभा केला आहे.एक अभ्यासू,शांत,शिस्तप्रिय आणि विकासाची गंगा मतदार संघात आणण्यासाठी एक निश्चित ध्येय ठेवून चालणारा राजकारणी अशी भीमराव धोंडे यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आहे.आष्टी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरसुद्धा त्यांची लोकप्रियता कायम राहिली.आष्टी,पाटोदा, शिरूर का.विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या चर्चेतून आणि आग्रहावरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा अशी इच्छा सर्वाकडुन व्यक्ती केली जात होती.या सर्वांचा आदर करत माजी आ.भीमराव धोंडे यांनी येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी भावनांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयातुन मिळली आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार हे सत्ता पक्षातील अत्यंत आक्रमक धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या पक्षातून त्यांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी शक्ती आणि बळ मिळेल आणि सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर आणि सर्व घटकांना अपेक्षित न्याय मिळेल अशी अपेक्षाही या निमित्ताने माजी आ.धोंडे यांनी व्यक्त केले आहे.यानंतर मात्र मतदार संघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार असून भीमराव धोंडे यांना मोठे यश प्राप्त होईल असा राजकीय अंदाज आहे.माजी आ.भीमराव धोंडे हे भाजपमधून निलंबन केल्यानंतरसुद्धा त्यांनी भाजपात पुनर्प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु विधानसभा अपक्ष लढवल्याने भाजपचे आ.सुरेश धस यांनी लेखी पत्र देऊन भाजपामध्ये प्रवेश देऊ नये असे म्हटले.ना.पंकजा मुंडे यांच्याकडून सुद्धा वरिष्ठ स्तरावरून भीमराव धोंडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न झाला नाही म्हणून अखेर सत्ताधारी पक्षातच प्रवेश घेण्याचा निर्णय माजी आ.भीमराव धोंडे यांनी घेतला आणि त्याला ११ नोव्हेंबरचा मुहूर्तही मिळाला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार !
माजी आ.भीमराव धोंडे यांचा आष्टी,पाटोदा,शिरूर का. विधानसभा मतदार संघात मोठा मतदार आहे एक संयमी,शांत,शिस्तप्रिय आणि विकासाभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाने येत्या काळात होणाऱ्या विविध निवडणुकां मधून याचा प्रत्यय येईल.यानिमित्ताने राजकीय समीकरणे मात्र नक्की बदलणार हे मात्र निश्चित !