झोपडीतून सुवर्णकुस्तीपटू बनलेला सनी फुलमाळी;बहरैनमध्ये आशियाई युवा स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक
आष्टी तालुक्याची मान उंचावल्याने आ. सुरेश धस यांच्याकडून अभिनंदन व कौतुक
click2ashti-तालुक्यातील पाटसरा येथील सनी फुलमाळीने बहरैनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत (६०) किलो गटात सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे.झोपडीत वाढलेला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सनीने मिळवलेलं हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलं असून बहरैनमध्ये आशियाई युवा स्पर्धेत ६० किलो गटात सुवर्णपदक पटकावत मोठे यश संपादन केले आहे.यशाबद्दल आष्टीमतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनंदन करत सनीचे कौतुक केले आहे.
सनीचा परिवार गेल्या १५ वर्षांपासून लोहगाव परिसरात वास्तव्यास आहे. वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात, तर आई सुई-दाभण विकून उदरनिर्वाह करतात.अशा परिस्थितीतही सनीने हार न मानता कुस्तीच्या माध्यमातून जीवन बदलवण्याचा निर्धार केला आणि आज तो देशाचा मान उंचावणारा सुवर्णपदक विजेता ठरला आहे.सनीचा कुस्तीप्रवास आजोबांच्या काळापासून सुरू झाला.वडिलांनाही कुस्तीची आवड होती, मात्र आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली.तरीही माझी मुलं पैलवान व्हावीत ही त्यांची इच्छा कायम राहिली.त्यांनी आपल्या तीन मुलांना भैय्या,बादल आणि सनी यांना स्वतः प्रशिक्षण दिलं.झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती तालीम उभारून सुभाष फुलमाळी मुलांना सराव शिकवत असत.सनीचा खेळ पाहून रायबा तालीमचे वस्ताद पै.सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला मार्गदर्शन सुरू केलं.पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या प्रशिक्षणाखाली सनी अधिक परिपक्व झाला. वस्ताद भोंडवे यांनी त्याला दत्तक घेत सर्व खर्च उचलत सनीचं भविष्य घडवलं.सध्या सनी दहावीमध्ये शिक्षण घेत असून,महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देशाचा गौरव वाढवला आहे.आष्टी मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी सनीचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून लवकरच त्याचा सत्कार आयोजित केला जाणार आहे.
————————————
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभं राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणं ही मोठी कामगिरी आहे.सनी फुलमाळीने आपल्या मेहनती,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे.अशा तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी आहे.सनीचं हे यश ग्रामीण भागातील असंख्य तरुणांना प्रेरणा देणारं आहे.लवकरच त्याचा गौरव करून सन्मान केला जाणार आहे.
-आ.सुरेश धस आष्टी मतदारसंघ