व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीचा भुमिपुत्र सनी फुलमाळी यांचे पालकत्व चंद्रकांत दादांनी स्विकारले;दरमहा स्वतःच्या पगारातुन देणार ५० हजार

पालावर जाऊन केला सत्कार

0

click2ashti-नुकत्याच बहरीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळीचे आयुष्य बदलले आहे. घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्याने हे यश मिळवले.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी पालावर राहणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व स्वीकारले आहे.तसेच पाटील यांनी लोकसहभागातून सनीसाठी घर आणि कुस्तीच्या सरावासाठी तालीम बांधून देण्याची घोषणा केली.त्याच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.याशिवाय,स्वतःच्या पगारातून दरमहा ५० हजार रुपये देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगाव येथील पालावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सनीचे अभिनंदन करत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटीदरम्यान सनीचे प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे, भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे,माजी नगरसेवक बॉबी टिंगरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,”जिद्द,चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली, हे त्याच्या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद आहे.”
पाटील यांनी सनीने आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे,अशी इच्छा व्यक्त केली.तसेच,त्याने ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण कामगिरी करावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या १७ वर्षांवरील खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.मात्र,१७ वर्षांखालील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.