बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत,प्रवाशांची गैरसोय वाढली
११ वर्षांपासून बसस्थानकाचे काम सुरूच
गणेश दळवी आष्टी-शहरातील नव्या बसस्थानकाचा वापर अद्याप सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे.बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन बसस्थानकात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असून मोठी प्रतीक्षालये,स्वच्छतागृहे, तिकीट काऊंटर,व्यापारी दुकाने अशा अनेक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.मात्र प्रशासकीय विलंबामुळे या सुविधा कागदावरच राहिल्या आहेत.सध्याचे बसथांबे अरुंद आणि अपुरे असल्यामुळे बस थांबल्यावर मोठी गर्दी होते. विशेषतःविद्यार्थ्यांना व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात प्रवाशांची अवस्था अधिकच हालाखीची होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली असली तरी अद्याप पावले उचलली गेलेली नाहीत.त्यामुळे बसस्थानक लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा,अशी मागणी वाढत आहे.
आष्टी बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत ११ वर्षांची प्रतीक्षा अजून वाढणार
आष्टी येथील नव्या बसस्थानकाचे काम सन २०१४ पासून सुरू असून तब्बल ११ वर्षे उलटूनही काम पूर्णत्वास आलेले नाही.त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.अजूनही पाच ते सहा महिने कामाला लागणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी दिली.
“काम लवकर पूर्ण करा, उद्घाटन करा”नागरिकांची मागणी
अनेक नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली तरी संबंधितांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.त्यामुळे बसस्थानक त्वरित सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संपत सायकड यांनी केली आहे.