व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

परळीत स्ट्राॅंग रुम बाहेर राडा;पोलिसांचा लाठीचार्ज

0

click2ashti-नगर परिषद निवडणुकीचे मतदान मंगळवारी पार पडले.निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.त्यामुळे निकालाच्या आधीच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरून वातावरण चांगलेच तापले आहे.परळीमध्ये बुधवारी रात्री नगर परिषदेत स्ट्राँग रूमची पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख आणि उपस्थित कर्मचारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.यावेळी समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या तणावामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.यामुळे नगर परिषद समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार,दीपक देशमुख हे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेतील स्ट्राँग रूमच्या पाहणीसाठी गेले होते.यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला.या घटनेची माहिती मिळताच देशमुख समर्थक मोठ्या संख्येने नगरपरिषदेबाहेर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.ज्या कर्मचाऱ्याने शिवीगाळ केली,त्याची वैद्यकीय तपासणी (मेडिकल)करण्यात यावी,अशी मागणी देशमुख यांनी लावून धरली.
देशमुखांनी कर्मचाऱ्यांवर दाखवला होता अविश्वास
दरम्यान,नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी सकाळी नगरपरिषद इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीनमध्ये ठेवण्यात आल्या.त्यावेळी दीपक देशमुख यांनी स्ट्राँग रूमवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर अविश्वास व्यक्त करत स्ट्राँग रूमबाहेर थांबण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पार्किंगमध्ये स्क्रीनची व्यवस्था केली आहे,तरीही रात्री हा राडा झालाच.
पोलिसांचा लाठीचार्ज आणि दोन तास तणाव
तणाव वाढल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले.मात्र,नगर परिषदेच्या गेटबाहेर जमाव आक्रमक झाल्याने आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला.या गोंधळामुळे सुमारे दोन तास नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण होते.सध्या तिथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.