माजीमंत्री जयंत पाटील यांनी नाभिक समाजाची माफी मागावी-प्रविण कदम
जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून जाहीर निषेध
click2ashti-आष्टी-विधानसभा अधिवेशनादरम्यान “पोलिस काय हजामत करतात का?” असे कथित वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जयंत पाटील यांचा आष्टी शहर नाभिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून,माजी मंत्री जयंत पाटील नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी आष्टी तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रविण कदम यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आष्टी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या वक्तव्यामुळे पोलिस दलाचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत असून,पोलिस संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील कायदा- सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांविषयी अशा प्रकारची टिप्पणी अयोग्य व अपमानास्पद असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.पोलिस हे चोवीस तास जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात;त्यांच्या कामाचा अवमान करणारी भाषा लोकप्रतिनिधींनी टाळावी,अशी मागणी समाजाच्या वतीने असून,निषेधार्थ काही ठिकाणी घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले.संबंधित वक्तव्याबाबत जयंत पाटील यांनी जाहीर स्पष्टीकरण द्यावे व पोलिस दलाची माफी मागावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.दरम्यान,या प्रकरणावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून,सत्ताधारी व विरोधी पक्षांनी परस्पर आरोप- प्रत्यारोप सुरू केले आहेत.या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.