नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२चा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा-आ.सुरेश धस
click2ashti-मतदारसंघातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ मध्ये जवळपास ८३ गावांचा समावेश करण्यात आला असून,या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,असे ठाम प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ८ ते १० या वेळेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योजनेची माहिती देणे गरजेचे असल्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यातील समाविष्ट गावांच्या ग्रामस्तरीय समित्यांसाठी शहरातील लक्ष्मी लॉन्स येथे शनिवार (दि. २७) रोजी दुपारी १.३० वाजता आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विभागीय कृषी अधिकारी उध्दव गर्जे, आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, पाटोदा तालुका कृषी अधिकारी शेळके, शिरूर (का.) तालुका कृषी अधिकारी गांगर्डे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे,सरपंच विद्या गायकवाड, नगराध्यक्ष जिया बेग,माऊली जरांगे,गणेश शिंदे,महेंद्र गर्जे,राजेंद्र दहातोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.धस पुढे म्हणाले की, पोकरा योजनेत आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील ८३ गावांचा समावेश झाला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. पशुपालनाच्या बाबतीत विशेषतः विधवा महिलांना लाभ व्हावा यासाठी शेळ्या बाजारातून खरेदी करण्यास परवानगी मिळावी, याबाबत मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ही योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावे,अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.उपविभागीय कृषी अधिकारी उध्दव गर्जे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ बाबत सविस्तर माहिती दिली.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शेती अधिक शाश्वत व हवामान बदलास अनुकूल बनवणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.टप्पा-२ अंतर्गत जलसंधारणाची कामे, शेततळी, नाला खोलीकरण, मृद व जल व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, पीक पद्धतीत बदल तसेच कडधान्य व तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.शेतकरी गट,महिला बचत गट व ग्रामस्तरीय संस्थांच्या सहभागातून सामूहिक विकास साधण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले. त्यांनी सांगितले की, या योजनेत आष्टी तालुक्यातील ३६,पाटोदा तालुक्यातील २७ आणि शिरूर (का.)तालुक्यातील २० गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी जागतिक पातळीवर निधी उपलब्ध होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.