आष्टी नागरी पतसंस्थेला माजी आमदार निवृत्ती उगले यांचे नाव
पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे यांची माहिती
click2ashti-येथील नागरी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी स्व.माजी आमदार निवृत्ती उगले यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे ही संस्था आज वटवृक्षात रूपांतरित झाली असून,गेल्या ३४ वर्षांत या पतसंस्थेने केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.स्व.उगले यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे नामकरण आता “माजी आमदार निवृत्ती उगले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आष्टी”असे करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे यांनी दिली.
सोमवार (दि.२९) रोजी झालेल्या नामकरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलास सोनवणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव दरेकर व भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी राकेश शाही उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नवनित कटारिया, संचालक नकुल गुरव,निर्मला सोनवणे,डॉ.सुजय सोनवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.विलास सोनवणे म्हणाले की, सन १९९२ मध्ये स्व.माजी आमदार निवृत्ती उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. गेल्या ३४ वर्षांत त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असले तरी त्यांचे कार्य व योगदान कायम स्मरणात राहावे, या उद्देशाने येत्या १ जानेवारी २०२६ पासून संस्थेच्या नावात त्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,स्व.उगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्यकर्ता म्हणून काम केले असून त्यांनी आमदारकीच्या काळात केलेली विकासकामे अजरामर आहेत. आष्टी तालुका तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यात समाविष्ट व्हावा ही त्यांची इच्छा होती.मात्र तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल जगताप यांनी केले तर आभार व्यवस्थापक काकासाहेब पोकळे यांनी मानले.कार्यक्रमास संस्थेचे सभासद,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.