शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या-अशोक साळवे
गंगाई-बाबाजी महोत्सव (दुसरा दिवस)
click2ashti-शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात भविष्यकाळात यशस्वी करिअर घडविण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्पर्धात्मक वातावरणात राहणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) चे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी केले.

आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गंगाई–बाबाजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार (दि. ३०) रोजी झालेल्या शालेय गटाच्या सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमात ते बोलत होते.या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये तालुक्यातील व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’,‘पावसाचे पाणी आडवा, पाणी जिरवा’,‘शेतकरी वाचला पाहिजे’अशा सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या गीतांवर नृत्य,समूहगायन व नाट्यसादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन व शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार भीमराव धोंडे,संस्थेचे सहसचिव तथा युवा नेते डॉ.अजय धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, चेअरमन राजेंद्र धोंडे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, भीमराव गुरव, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सानप,शरद रेडेकर,गणेश दळवी,मनोज पोकळे,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना अशोक साळवे म्हणाले की,आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यास पुरेसा नसून कला, क्रीडा, सांस्कृतिक व वक्तृत्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.अशा मंचामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. गंगाई–बाबाजी महोत्सवासारखे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.