‘कांदा-भाकर खाऊन लढलेल्या मावळ्यांचा इतिहास शाहिरीतून जिवंत’
गंगाई–बाबाजी महोत्सवात शाहिर शितल साठे व सचिन माळी यांची स्फूर्तीदायी सादरीकरणे
click2ashti-“आरे कांदा अन् भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा” या प्रभावी ओळींतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे त्यागमय, संघर्षपूर्ण व स्वाभिमानी जीवन शाहिर शितल साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडून दाखवले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते भारावून गेले.शिवकाळातील सामान्य माणसाचे जीवन,अल्प साधनांवर लढलेला स्वराज्याचा संघर्ष, मावळ्यांची निष्ठा,धैर्य आणि स्वराज्यासाठी केलेला बलिदान यांचे सखोल विषयविश्लेषण शाहिर साठे यांनी आपल्या खास शैलीत मांडले. कांदा-भाकरसारख्या साध्या अन्नावर जगत मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांचे जिवंत चित्रण करत त्यांनी आजच्या पिढीला इतिहासातील वास्तवाची जाणीव करून दिली.
आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘गंगाई–बाबाजी महोत्सव’ च्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार (दि.३०) रोजी सायंकाळी ६ वाजता शाहिर सचिन माळी व शाहिरा शितल साठे यांच्या स्फूर्तीदायी गीतांचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.या महोत्सवाअंतर्गत तरुण पिढीसाठी विशेष स्वरूपाचा‘नव यान महाजलसा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.समाजप्रबोधन, परिवर्तन, युवकांची दिशा तसेच समकालीन प्रश्नांवर आधारित गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. शाहिरांच्या ओजस्वी आवाजात सादर झालेल्या गीतांनी परिसरात उत्साहाचे व परिवर्तनाचे वातावरण निर्माण केले.कार्यक्रमास माजी आमदार भीमराव धोंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे सहसचिव तथा युवा नेते डॉ.अजय धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,भाऊसाहेब लटपटे,अॅड.रत्नदीप निकाळजे,प्राचार्य डॉ. हारिदास विधाते,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.शाहिर शितल साठे व शाहिर सचिन माळी यांनी सादर केलेल्या गीतांनी सामाजिक भान जागृत करत तरुणाईला नवी दिशा दिली.कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उस्फूर्त दाद मिळाली.राज्यस्तरीय गंगाई–बाबाजी महोत्सवाने कला,संस्कृती व सामाजिक प्रबोधनाचा वारसा अधिक दृढ करत दुसऱ्या दिवशीही रसिकांची मने जिंकली.