व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे जाहीर आवाहन;थकीत पगारासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा

0

click2ashti-कडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी आपल्या हक्काच्या थकीत पगारासाठी दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी ठरला असून,मा.सर्वोच्च न्यायालयाने कामगारांची देय रक्कम व्याजासह अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी कारखान्याची स्थावर मालमत्ता विकून कामगारांचे देणे अदा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.मात्र,असे असूनही विद्यमान संचालक मंडळ कामगारांचे थकीत पगार देण्याबाबत गंभीर व सकारात्मक भूमिका घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. उलट, केंद्र सरकारकडून कारखान्याचे लायसन्स नूतनीकरण करून कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अलीकडेच नवीन कामगार भरतीच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या असून,शेतकरी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले. मात्र या सर्व कार्यक्रमांमध्ये माजी आमदार भिमराव उर्फ भिमसेनराव धोंडे यांनी कामगारांच्या थकीत पगाराबाबत एक शब्दही न काढल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कामगारांनी आरोप केला आहे की,विद्यमान संचालक मंडळ व माजी आमदार धोंडे साहेब कामगारांना गृहित धरत असून, त्यांच्या हक्काच्या रकमेबाबत नैतिकतेचा अभाव दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पगार न मिळाल्याने सुमारे ३० ते ४० टक्के कामगार उपासमारीने मृत्युमुखी पडले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, तर काहींना देशोधडीला लागावे लागले.अनेक कामगारांच्या मुलांचे भवितव्य अंधारात गेले असल्याची व्यथा कामगारांनी मांडली.
“कामगारांच्या कष्टावर उभे राहिलेले साम्राज्य विसरून कामगारांवर अन्याय केला जात आहे. बहिऱ्यांना मोठ्या आवाजाची गरज असते आणि ती गरज आज संचालक मंडळाला व धोंडे साहेबांनाही आहे,” असा इशाराही कामगारांनी दिला आहे.कामगारांची देणी पूर्णपणे अदा केल्याशिवाय एकाही नव्या कामगाराला कारखान्याच्या गेटच्या आत पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला आहे.
२ जानेवारी रोजी निर्णायक बैठक
या न्यायाच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्व कामगार, त्यांची मुले,नातेवाईक व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(दि.२) जानेवारी स्थळ-कडा साखर कारखाना साइट,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वेळ: सकाळी ११ वाजता “एकजूट हाच आपला खरा शस्त्र आहे,”असा संदेश देत कामगारांनी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार कामगार पुत्र प्रताप थोरवे यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.