संत वामनभाऊ महाराजांचा ५० वा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा उत्साहात सुरू आ.सुरेश धस यांच्या हस्ते पूजन
click2ashti-श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याला आजपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सप्ताहाच्या प्रारंभी आ.सुरेश धस तसेच गडाचे महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
या पावन प्रसंगी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पादुकापूजन, समाधीपूजन तसेच पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आ.सुरेश धस यांनी या सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होत संतांच्या चरणी मनोभावे दर्शन घेतले.श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जन्म इ.स. १८९१ मध्ये झाला असून २४ जानेवारी १९७६ रोजी त्यांनी देहत्याग केला. त्यानंतर २५ जानेवारी १९७६ रोजी त्यांची समाधी स्थापन करण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून, यावर्षी शनिवारचा शुभयोग लाभल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.प.पू.विठ्ठल महाराज यांनी संतांची मठपरंपरा अखंडपणे जपली असून भक्ती, सेवा आणि अध्यात्माची परंपरा पुढे नेण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.शनिवारी सकाळी होम-हवनाने या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची सुरुवात झाली असून दैनंदिन अखंड कीर्तनसेवा सुरू असणार आहे.
समारोपाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती
या कालावधीत महाराष्ट्रासह विविध भागांतून लाखो भाविक गहिनीनाथ गड येथे दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, संत वामनभाऊ महाराजांच्या विचारांचा आणि भक्तीमार्गाचा जागर या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे.