आष्टी येथे ११ ते १७ जानेवारीदरम्यान संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा
आ.सुरेश धस प्रतिष्ठानचा पुढाकार;मंदार महाराज रामदासी यांचे कथाकथन
click2ashti-आ.सुरेश धस प्रतिष्ठानाच्या वतीने आष्टी येथे दि.११ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा संपन्न होत असून,देवदास स्वामी मठ,दादेगाव येथील परमपूजनीय महंत मंदार महाराज रामदासी हे श्रीराम कथेचे प्रभावी निरूपण करणार आहेत.

आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होणार असून,दि. ११ ते १७ जानेवारीदरम्यान दररोज दुपारी १२.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत श्रीराम कथा रंगणार आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत विशेष श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य सोहळ्याच्या प्रारंभाच्या पूर्वसंध्येला आकर्षक शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तसेच दररोज प्रभू श्रीरामाची आरती, संत पूजन व भाविकांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.या श्रीराम कथा ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून भक्ती, संस्कार व अध्यात्माचा जागर होणार असून,सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्रीराम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.