व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मनरेगा कामांना दुजाभाव केल्यास आंदोलन तीव्र करू-माजी आमदार धोंडे,आजबे यांचा इशारा

आष्टी तहसील कार्यालयासमोर माजी आमदार धोंडे–आजबे यांचे धरणे आंदोलन संपन्न

0

click2ashti-मतदार संघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली कामे असोत,ती कोणताही दुजाभाव न करता सरसकट सुरू करण्यात यावीत.अधिकाऱ्यांनी समाजासाठी काम करत असल्याची जाणीव ठेवावी.आम्ही वीस वर्ष आमदारकी सांभाळली आहे,त्यामुळे आम्हाला फुगेवाले समजू नये, असा स्पष्ट इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे आष्टी,पाटोदा व शिरूर मतदार संघातील खराब झालेली बंधारे,रस्ते,नदीवरील पूल तसेच पाझर तलावांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत बंद असलेल्या विहिरी व त्यांचे मस्टर तात्काळ सुरू करण्यात यावेत, या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी गुरुवार (दि.८ जानेवारी) रोजी सकाळी ११.३० वाजता आष्टी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार भीमराव धोंडे बोलत होते.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब आजबे,आष्टी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, दीपक घुमरे, विश्वास नागरगोजे,भाऊसाहेब लटपटे,अशोक साळवे,दशरथ वनवे,धैर्यशील थोरवे,अभयराजे धोंडे,भाऊसाहेब घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार धोंडे म्हणाले की,तालुक्यातील काही अधिकारी एकल कारभार करत असून मनरेगा कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. सध्याचे पोलीस निरीक्षक फोन घेत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अधिकारी हे सर्वसामान्यांचे असतात, लोकांना न्याय देणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. आम्हालाही कठोर भूमिका घ्यावी लागेल,पण आम्ही कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करत नाही.मात्र आंदोलनानंतरही जर दुजाभाव दिसून आला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना आंदोलन करावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. मात्र झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करावे लागले.पंचायत समिती कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर खुर्चीवर बसणे अवघड होईल. जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांच्या ग्रामपंचायत कामांमध्ये अडथळे आणू नयेत, अन्यथा यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.धरणे आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांना देण्यात आले. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कामे सुरू करावीत,अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.