शुक्रवारी आष्टी तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार
नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-तहसिलदार पाटील
click2ashti-आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय अडचणी, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांना थेट न्याय मिळावा, या उद्देशाने बीड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.९ जानेवारी २०२६ रोजी आष्टी तहसील कार्यालयात जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.हा जनता दरबार दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत होणार आहे.सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, शासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी तसेच लोकशाही प्रक्रियेत जनतेचा थेट सहभाग वाढावा,यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे.या जनता दरबारात आष्टी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात,असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
जनता दरबारामध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे प्रश्न, अतिक्रमणासंदर्भातील तक्रारी, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, महसूल विभागाशी संबंधित समस्या, जन्म–मृत्यू नोंदणी, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी शासकीय योजनांमधील अडचणींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.नागरिकांनी जनता दरबारात आपली तक्रार किंवा निवेदन लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांवर संबंधित विभागप्रमुखांच्या माध्यमातून तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असून, प्रत्येक अर्जाचा योग्य पाठपुरावा केला जाणार असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आष्टी तालुक्यातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, त्यांच्या अडचणी तात्काळ सुटाव्यात,या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.