बिले दुरुस्त केली नाहीत तर शहरातील एकही नागरिक बिल भरणार नाही;नगराध्यक्ष जिया बेग यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
click2ashti-आष्टी शहरातील नागरीकांना गेल्या अनेक दिवसांपासून अव्वाच्या सव्वा व अवास्तव वीज बिले येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांनी आपली गा-हाणी आमदार सुरेश धस यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार गुरुवार (दि.८) रोजी दुपारी नगर पंचायत पदाधिकारी व महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी सविस्तरपणे ऐकून घेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष जिया बेग यांनी महावितरण कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या वीज बिलांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महावितरणकडून बिले देताना मनमानी सुरू असून,मनानेच बिले दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.नगराध्यक्ष जिया बेग म्हणाल्या की,जर वीज बिलांमध्ये तात्काळ पारदर्शकता आणली नाही, चुकीची व अवास्तव बिले दुरुस्त केली नाहीत,तसेच फॉल्टी मीटर व चुकीच्या रीडिंगची योग्य तपासणी केली नाही, तर शहरातील एकही नागरिक वीज बिल भरणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.यावेळी महावितरणचे उप अभियंता शिवाजी देशमुख यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत फॉल्टी मीटर रीडिंगची तपासणी केली जाईल. आवश्यक त्या ठिकाणी मीटर बदल, पुनर्तपासणी व योग्य माहिती घेऊन बिले दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.या बैठकीनंतरही नागरिकांमध्ये अद्यापही नाराजी कायम असून,लवकरात लवकर न्याय मिळावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वीज बिलांचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.