तहसिलदार वैशाली पाटील रजेवर जाताच तहसिल कार्यालयातून जप्त वाळूचा टॅम्पो माफियांनी पळवला
काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निकामी अधिकारी एकवटले..!
click2ashti-आष्टी तहसिल कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींनी प्रशासनातील अंतर्गत गटबाजी, कामचुकार अधिकाऱ्यांचा प्रतिकार आणि अवैध वाळू माफियांचे धाडस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.कामाला प्राधान्य देणाऱ्या, शिस्त लावणाऱ्या आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातच निकामी व गैरहजर अधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाला वेठीस धरल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
नागपूर येथून आष्टी तहसिलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या वैशाली पाटील यांनी गेल्या दीड वर्षांत तहसिल कार्यालयाची कार्यपद्धती पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केला.कामचुकार तलाठी,मंडळअधिकारी यांना त्यांनी कामाची शिस्त लावली, मुख्यालयात राहण्याचे सक्तीचे आदेश दिले आणि नियमित कामकाज सुरू केले.अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या तलाठी व अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करणाऱ्या त्या आष्टीतील एकमेव तहसिलदार ठरल्या.
कामचुकार अधिकाऱ्यांना डोईजड झालेली शिस्त
१०–१५ वर्षांपासून एकाच सज्जावर असलेले तलाठी,नगर (अहिल्यानगर) येथून रोज अपडाऊन करणारे मंडळ अधिकारी व तलाठी यांना मुख्यालयात राहणे,वेळेत कार्यालयात हजर राहणे आणि जनतेची कामे करणे हे ‘डोईजड’ठरू लागले.परिणामी सर्व तलाठी व संबंधित अधिकारी एकत्र येत तहसिलदार पाटील यांच्या बदलीची मागणी करत कामबंद आंदोलनाच्या मार्गावर गेले.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि संशयास्पद घडामोडी
या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भूसुधारचे रणवरे यांना आष्टी तहसिलचा पदभार दिला.दरम्यान तहसिलदार वैशाली पाटील या रजेवर गेल्यानंतर अवघ्या काही तासांतच धक्कादायक प्रकार घडला. पाटील यांनी कारवाई करून तहसिल कार्यालयात जप्त केलेला अवैध वाळू वाहतूक करणारा टॅम्पो शुक्रवारी मध्यरात्री वाळू माफियांनी थेट तहसिल कार्यालयातून पळवून नेला.ही घटना म्हणजे प्रशासनातील ढिसाळ सुरक्षा,अंतर्गत संगनमत आणि माफियांची वाढलेली मस्ती याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
जनहिताच्या कामांना अडथळा?
गेल्या दीड वर्षांत आष्टी तालुक्यात स्वातंत्र्यानंतर आजवर रस्ताच न पाहिलेल्या वस्ती,वाडी व तांड्यांना सस्ती अदालतच्या माध्यमातून तडजोडीतून रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम वैशाली पाटील यांनी केले. शेकडो प्रकरणे मार्गी लागली. तलाठी आपल्या सज्जावर हजर राहून दैनंदिन कामे करू लागले. मात्र हीच कार्यपद्धती अनेक निकामी व गैरहजर अधिकाऱ्यांच्या पचनी न पडल्याने त्यांनी चुकीची निवेदने,आंदोलन आणि दबावतंत्र वापरून प्रशासनाला वेठीस धरल्याचा आरोप होत आहे.
नगरहून अपडाऊन करणारे अधिकारी हातबल
आष्टी तहसिल कार्यालयातील अनेक तलाठी व मंडळ अधिकारी यांची नियुक्ती आष्टीत असतानाही ते वास्तव्यास मात्र अहिल्यानगर शहरात आहेत. यामुळे कधी कार्यालयात येणे, कधी गैरहजर राहणे हे नेहमीचे झाले होते. परंतु तहसिलदार पाटील यांनी मुख्यालयात राहण्याचे आदेश काढताच या सर्वांनी वेगवेगळी कारणे पुढे करत लोकशाही मार्गाने आंदोलनाचा बुरखा चढवून कामबंद आंदोलन केले.
आता कारवाई होणार की नाही?
काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून कामचुकार व माफियांना अप्रत्यक्ष बळ मिळत आहे का?तहसिल कार्यालयातून जप्त केलेला टॅम्पो पळवून नेण्यामागे नेमके कोण जबाबदार आहेत?या प्रकरणी जिल्हाधिकारी कोणती ठोस कारवाई करतात,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.