व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विकासासाठी कधीही राजकारण न करणारा नेता हरपला-आ.सुरेश धस

आष्टीत स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

0

click2ashti-आष्टी तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.अजित पवार यांच्या निधनाने बीड जिल्हा पोरका झाला आहे.विकासाच्या बाबतीत त्यांनी कधीही राजकारण केले नाही.मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी मांडलेली कामे कोणत्या पक्षाची आहेत हे न पाहता त्यांनी तात्काळ मंजूर केली,असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवार,(दि.३०)रोजी दुपारी ३ वाजता स्व. अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले , सन २००८ मध्ये आष्टी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खुंटेफळ साठवण तलावाला स्व.अजित पवार यांनी मंजुरी दिली.सन १९९५ पासून त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. सन २००३ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला असताना,राज्यातील सर्वात मोठी छावणी मी चालवली होती. त्या छावणीसाठी सर्वाधिक मदत स्व. अजित दादांनी दिली. विकासाच्या प्रश्नावर त्यांनी कधीही राजकारण केले नाही,हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य होते.
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, स्व.अजित दादांची काम करण्याची पद्धत राजकारणासह सामान्य जनतेलाही चांगलीच परिचित होती.ते उत्तम राजकारणी तर होतेच, पण मनाने शेतीनिष्ठ शेतकरीही होते. एवढा मोठा व्याप आणि जबाबदाऱ्या असूनही ते दररोज सकाळी ८ वाजता फोन करून शेतीविषयक माहिती घेत असत. त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,स्व.अजित दादा एकदा दिलेला शब्द कधीही मागे घेत नसत. “जे बोललो ते बोललो” या त्यांच्या ठाम स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटत.त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,आम्ही चौघेही नेते स्व.अजित दादांसोबत काम केले आहे.इतका कामाचा माणूस माझ्या राजकीय जीवनात मी पाहिला नाही. त्यांच्या जाण्याने आपला जिल्हा दुर्दैवी ठरला आहे. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
यावेळी पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, सन २००१ साली आमदार सुरेश धस यांच्यामुळे मंत्रालयात स्व. अजित दादांची भेट झाली. त्यानंतर एक वर्षाने बारामतीला गेलो असता त्यांनी मला पाहताच “हे आष्टीहून आले आहेत” असे म्हणत ओळखले. लोकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा अशा अनेक आठवणींमधून दिसून येतो.या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती नियामत बेग, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,व्यापारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मेहेर,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुभाष राऊत,वकील संघातर्फे अॅड.रत्नदीप निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी,व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.