व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पुन्हा बिबट्या आला…! प्रात:विधी साठी गेलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

आष्टी तालुक्यातील कारखेल येथील घटना

0

आष्टी-सकाळच्या प्रात:विधीसाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये सदरील युवक गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आष्टी तालुक्यातील कारखेल बु|| येथे घडली.राम बबन गायकवाड वय वर्षे 33 असे युवकाचे नाव आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच आष्टी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत बिबट्याचे पायाचे ठशाचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासानुसार सदरील हल्ला हा बिबट्यानेच केला असल्याचा दुजोराही त्यांनी दिला.
आष्टी तालुक्यातील नागतळा,सुरुडी व कारखेल बुद्रुक या तिन्ही गावांच्या सीमेवर गणेश गड असून त्या डोंगराच्या खाली गायकवाड यांची वस्ती आहे. राम गायकवाड हे शुक्रवारी सकाळी प्रातविधीसाठी गेले असता झुडपामध्ये दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.त्यात त्यांच्या डोक्याला,पोटावर,हातावर जखमा झाल्याने रक्तबंबाळ झाले परंतु सदरील युवकाने मोठ्या धाडसाने सामना करत बिबट्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली.त्यानंतर त्यांना धामणगाव येथील रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे.दरम्यान आष्टी वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी शाम सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी बी.पी.मोहोळकर वनरक्षक एस.काळे,एस.बी.शिंदे वन कर्मचारी तळेकर,शेख,दहिफळे,बेग आदींनी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावर बिबट्या वन्य प्राण्याचे पगमार्क मिळून आले. घटनास्थळाचा पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देऊ असे वन विभागामार्फत असे आश्वासन देण्यात आले.
अडीच वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यात तिघांना केले होते बिबट्याने ठार
साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती.दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी सुरुडी येथे नागनाथ गर्जे यांच्यावर पहिला हल्ला करून ठार मारले होते.त्यांनतर किन्ही व पारगाव येथील दोन जणांचा जीव घेतला होता.त्यावेळी अनेक दिवस तालुक्यातील नागरिक दहशतीखाली होते.मात्र सदरील बिबट्या करमाळ्याच्या आसपास मारल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला होता. त्यानंतर पुन्हा आता अडीच वर्षांनी कारखेल परिसरामध्ये बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.