जिंवत माणूस मयत दाखवत एलआयसी कंपनीला दोन कोटींचा गंडा;अहमदनगर जिल्ह्यातील घटना
क्लिक2आष्टी अपडेट-जिवंत माणूस मेलेला दाखवून ‘एलआयसी’कडून २ कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.हा बोगस विमा मिळवण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (मूळ रा. करमाळा,जि.सोलापूर) यांना अटक केली.या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी दिनेश प्रमोद टाकसाळे,त्याचे सहकारी अनिल भीमराव लटके,विजय रामदास माळवदे (सर्व रा.केडगाव)यांना अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी केडगाव येथील मुख्य आरोपी दिनेश टाकसाळे याने एप्रिल-२०१५ मध्ये ‘एलआयसी’ च्या दादर (मुंबई) शाखेकडून २ कोटींचा विमा घेतला होता.नंतर त्याने दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्ते भरले. दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदे) शिवारात २५ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे (रा.केडगाव) याचा असल्याचा दावा करण्यात आला.त्यासाठी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे याने बनावट मृत्यू दाखला देण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप आहे.दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत,१४ मार्च २०१७ रोजी दिनेशच्या आई-वडिलांनी दोन कोटींच्या विमा रकमेवर दावा केला.हा दावा’एलआयसी’कडून मंजूरही करण्यात आला,परंतु या प्रकरणाची शंका आल्याने’एलआयसी’ने चौकशी सरू केली.तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोन कोटींचा बोगस विमा लाटल्याप्रकरणी ‘एलआयसी’ च्या दादर शाखेचे सहायक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी शिवाजी पार्क (मुंबई) पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्याद दिली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुरुवातीला दिनेश टाकसाळे,अनिल लटके,विजय माळवदे यांना अटक केली.त्यानंतर बोगस मृत्यू दाखला देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलिसांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.विशाल केवारे यास अटक केली. डॉ.केवारे हा सातत्याने आरोपी अनिल लटके याच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्डवरुन स्पष्ट झाले आहे. त्या काळात बेलवंडी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल कैलास देशमुख याने अपघातातील मृत व्यक्ती दिनेश टाकसाळ याचा असल्याचा दावा नोंदविण्यात मदत केल्याचा संशय आहे.
पुणे-नगर रस्त्यावर विमाग्रस्ताचा अपघात झाल्याचा केला दावा
पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी शिवारात झालेल्या अपघातात दिनेशचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र,आता तो जिवंत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण ज्या बेवारस मृतदेहाभोवती फिरतेय,तो मृतदेह नेमका कोणाचा,असा प्रश्न निर्माण झाला आहे.हा खरंच अपघात होता,की एखाद्याचा अपघात घडवून आणला, याचा उलगडा कॉन्स्टेबल देशमुख याला अटक केल्यानंतरच समोर येऊ शकेल,असे सांगण्यात आले आहे.