निवडणूक कर्मचा-यांना दांडी मारणे पडले महागात..! तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश
आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.आष्टी तालुक्यातील ११० कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला दांड्या मारणा-या यामध्ये तीन निवडणूक निर्णय अधिकारी व एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दि.१८ व दि.२१ रोजी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी या दांडी बहाद्दर कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिला आहे.
प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायतच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतची निवडणूक जाहिर झाली असून,उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार दि.२८ पासून सुरू होणार आहे.त्याअनुषंगाने ५५ निवडणूक निर्णय अधिकारी व ५५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले परंतु देण्यात आलेल्या दोन्ही प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी
सी.आर.खताळ,डी.एम.बादाडे,धनंजय शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एफ.एम.पठाण हे चार कर्मचारी गैरहजर राहिल्याने तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्मचा-यांनी गांभीर्यांने घ्यावे-तहसिलदार
या प्रशिक्षणाकडे चार कर्मचा-यांनी पाठ फिरवली.या गैरहजर कर्मचा-यांना तात्काळ नोटीस बजावण्यात आल्या आहेत.याकर्मचा-यांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधित कर्मचा-यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 कलम 134 अन्वये निवडूक कामात गैरहजर प्रकरणी शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिली.