व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

रस्ता कामांतील ‘गायब’मजुरांचा मस्टर घोटाळा उघड,प्रत्यक्ष ठिकाणी एकही मजूर नाही; तरीही मस्टर फुल्ल!

मनसेचे कैलास दरेकर यांचा गटविकास अधिकाऱ्यांना जाब;चौकशीची मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा

0

click2ashti-तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्ता कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एकही मजूर उपस्थित नसताना मस्टरवर मात्र मजुरांच्या हजेऱ्या नियमितपणे कशा नोंदवल्या जात आहेत,असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते कैलास दरेकर यांनी आष्टी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) केला आहे.या प्रकारामुळे पंचायत समितीच्या कारभारावरच संशयाचे सावट निर्माण झाले असून,‘मस्टरचा अदृश्य खेळ’आता चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आष्टी तालुक्यातील एका महत्त्वाच्या ग्रामीण रस्ता कामाची मनसेचे नेते कैलास दरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक पाहणी केली.शासनाच्या नियमांनुसार या कामावर मोठ्या प्रमाणावर मजूर कार्यरत असणे अपेक्षित होते. कागदोपत्रीही मजुरांची उपस्थिती दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर तेथे एकही मजूर काम करताना आढळून आला नाही.संपूर्ण रस्ता निर्मनुष्य अवस्थेत होता.तरीदेखील मस्टरवर मजुरांची उपस्थिती पूर्ण दाखवण्यात येत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
“मस्टरचा हा कोणता जादूई खेळ?”–कैलास दरेकर
या प्रकारानंतर मनसेचे कैलास दरेकर यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
“जर प्रत्यक्ष रस्ता कामावर एकही मजूर नाही, तर मग मस्टरवर सह्या आणि अंगठे कोण मारत आहे? हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? मजुरांच्या नावावर शासनाचा निधी हडप करण्याचा हा मोठा डाव असून, यात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा संशय आहे.”
दरेकर यांनी प्रशासनाला थेट इशारा देत या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जेसीबीने काम,पण कागदावर मजूर?
ग्रामीण भागातील रोजगार हमी योजना (रोहयो) तसेच इतर विकासकामांमध्ये प्रत्यक्ष मजुरांऐवजी जेसीबी मशीनचा वापर करून कामे उरकली जातात आणि कागदोपत्री मात्र मजुरांची नावे दाखवून लाखो रुपयांचा निधी उचलला जातो, असे प्रकार राज्यभरात वेळोवेळी समोर आले आहेत. आष्टी तालुक्यातही असाच प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, अशा कामांमध्ये प्रत्यक्ष मजुरांना रोजगार न देता शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्यास तो अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे.त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित रस्ता कामांचे मस्टर तपासण्यात यावे तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कैलास दरेकर यांनी केली आहे.“जर प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले,तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,”असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तालुक्याचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे
दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नेमका काय खुलासा करतात, मस्टरवरील ‘गायब’ मजुरांचे गौडबंगाल कसे उलगडते आणि या प्रकरणात कोणावर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.