माजी आ.भीमराव धोंडे यांना दिल्लीत ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार
केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत नवभारत मीडिया ग्रुपकडून होणार सन्मान;शिक्षण,कृषी,सामाजिक व विकास कार्याची दखल
click2ashti-आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांना शिक्षण,कृषी,सामाजिक,राजकीय,क्रीडा व ग्रामीण विकास क्षेत्रातील चार दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नवभारत मीडिया ग्रुपच्या वतीने दिला जाणारा’महाराष्ट्र गौरव’पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार मंगळवार (दि.७)रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान,केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,हरदीपसिंग पुरी,अनुप्रिया पटेल,प्रतापराव जाधव,श्रीपाद नाईक,मुरलीधर मोहोळ,माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता,अभिनेत्री भूमी पेडणेकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.माजी आ.धोंडे यांनी शिक्षणाचा प्रसार,ग्रामीण विकास,शेतकरी चळवळ,रस्ते,सिंचन,आरोग्य,सहकार आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक शैक्षणिक युनिट्समध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ग्रामीण भागात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी,नर्सिंग व इतर उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तसेच ५०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारणीसह विविध विकासकामांमुळे त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.