व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आरोपी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप;एपीआयंकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी

‘डॉ.पटवांना तात्काळ अटक करा’;अन्यथा तीव्र आंदोलनाचा कडेकरांचा इशारा!

0

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. डॉ. महेंद्र पटवा यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कडा ग्रामस्थांनी आष्टी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरोपी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे कारण पुढे करून अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे.
याबाबत ४ सप्टेंबर २०२६ रोजी कडा ग्रामस्थांच्या वतीने एपीआय साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित निवेदनात मुलीवर झालेल्या अन्यायामुळे आरोपीची तातडीने अटक होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले असून, अटक लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला तातडीने अटक करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी कडा ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
‘उपचाराच्या नावाखाली अटकपूर्व जामिनाचा प्रयत्न?’
ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. महेंद्र पटवा यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित गुन्हेगार रुग्णालयात उपचार घेण्याच्या नावाखाली अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पीडित मुलीवर झालेल्या कथित अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आरोपीला अटक होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात विलंब न करता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आधी ‘पटवा, हटवा’, आता ‘पटवांना अटक करा’
या प्रकरणामुळे कडा शहरात गेल्या काही दिवसांपासून संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी नागरिकांनी ‘पटवा, हटवा’ अशी मागणी करत कडा शहर बंद ठेवले होते. त्यानंतर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाने डॉ. महेंद्र पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित केले. तसेच कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशननेही त्यांना उपाध्यक्षपदावरून निलंबित केल्याचे पत्र समोर आले आहे.आता ग्रामस्थांनी थेट पोलिसांकडे धाव घेत अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आंदोलनाची दिशा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी निवेदनाच्या शेवटी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, डॉ. महेंद्र पटवा यांना लवकरात लवकर अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.त्यामुळे पोलिस प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते,याकडे कडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती असून,त्यांची वैद्यकीय स्थिती आणि डॉक्टरांचे मत यानुसार पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ग्रामस्थांनी केलेला अटकपूर्व जामिनाचा आरोप हा त्यांच्या निवेदनातील दावा असून,त्याबाबत अधिकृत न्यायालयीन माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.