परवानगी व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या स्टोन क्रशरवर कारवाई;आष्टी तालुक्यातील सर्व क्रशर सील
सील तोडून क्रशर सुरू केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा तहसीलदारांचा इशारा
click2ashti-आष्टी तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांना तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली असून,आवश्यक परवाने व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तालुक्यातील स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बीड तसेच उपविभागीय अधिकारी,पाटोदा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
स्टोन क्रशर परवाना,खदान परवाना,डीएमएफ चलन,एकरकमी रूपांतरित कर भरणे तसेच E-TPS PASS चा वापर करणे आदी बाबींबाबत संबंधित क्रशरधारकांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र,आवश्यक परवानगी व दस्तऐवजांची पूर्तता न करणे, विविध परवान्यांचे नूतनीकरण न करणे आदी कारणांमुळे आष्टी तालुक्यातील स्टोन क्रशर मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत सील करण्यात आले आहेत.
दरम्यान,सील करण्यात आलेले स्टोन क्रशर संबंधित चालकांनी सील तोडून पुन्हा सुरू करण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. सील तोडून स्टोन क्रशर सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा सील केलेला क्रशर सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित चालकाविरुद्ध MLRC नियमांनुसार तसेच फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.
सील केलेल्या क्रशरशी संबंधित कोणत्याही प्रकारची नियमबाह्य कृती झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्टोन क्रशर चालकाची राहील,असे तहसीलदार आष्टी यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.