व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्रीगेंरी देवस्थान पुन्हा चोरट्यांच्या निशाण्यावर ! सलग पाचव्या वर्षी पुन्हा चोरी

दानपेटी फोडून चांदीचे दागिने व रोकड असा ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास;पाच वर्षांत वारंवार चोरी,मात्र एकाही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश नाही

0

click2ashti-तालुक्यातील श्रीगेंरी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या मंदिरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.शनिवार,(दि.३)ऑक्टोबर रोजी रात्री चोरट्यांनी मंदिराचे चॅनल गेट तोडून आत प्रवेश करत दानपेटी फोडली.यामध्ये चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष विजय मारुती हराळ यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगेंरी देवीचे मंदिर हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून,दरवर्षी जानेवारी महिन्यात देवीची सुमारे पंधरा दिवसांची यात्रा भरते.यात्रेदरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात.मात्र,गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून वर्ष संपत आले की मंदिरात चोरी होण्याची जणू मालिकाच सुरू झाली असून, मागील पाच वर्षांच्या कालावधीत मंदिरात चोरी व दरोड्याच्या घटना घडूनही अद्याप एकाही चोरट्याचा शोध लागलेला नसल्याने भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,देवस्थान समितीने मंदिराच्या सुरक्षेसाठी बाळू निकाळजे यांची राखणदार म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारच्या रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप व कडी-कोंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी लक्ष्य केली.चोरट्यांनी दानपेटीची कडी-कोंडा तोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली.तसेच मंदिरातील चांदीचे दागिनेही चोरून नेल्याचे समोर आले आहे.दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.चोरीमुळे देवस्थानचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळी पूजा करण्यासाठी आल्यानंतर चोरी उघड
रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मंदिराचे पुजारी कल्याण निंबाळकर मंदिरात आले असता त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.त्यांनी तत्काळ देवस्थानचे अध्यक्ष विजय हराळ यांना घटनेची माहिती दिली.यानंतर अध्यक्ष हराळ तसेच सरपंच रोहिदास पवार यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता मंदिरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली. अध्यक्ष विजय मारुती हराळ यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच वर्षांपासून चोरीचे सत्र; चोर मात्र मोकाट!
श्रीगेंरी देवस्थानात गेल्या काही वर्षांपासून चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून वर्ष संपत आले की मंदिरात चोरीची घटना घडत असल्याचे चित्र आहे.मंदिरातील दागिने,दानपेटी आणि रोकड चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने देवस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या पाच वर्षांत मंदिरावर दरोडा अथवा चोरीच्या घटना घडूनही अद्याप एकाही चोरट्याला पोलिसांच्या हाती लागण्यात यश आलेले नाही.त्यामुळे‘मंदिरात चोरी होते,गुन्हा दाखल होतो;मात्र चोरट्यांचा शोध कधी लागणार?’ असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
देवस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरवर्षी जानेवारी महिन्यात श्रीगेंरी देवीची पंधरा दिवसांची यात्रा भरते. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत मंदिराच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे.मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे,रात्रीची प्रभावी गस्त, सुरक्षा व्यवस्था तसेच दानपेटी व मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या चोरीच्या घटनेचा तपास आष्टी पोलिसांकडून सुरू असून, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमागील चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.