आष्टीत एसीबीची धडक कारवाई;१८ हजारांची लाच घेताना महिला सहाय्यक अभियंता रंगेहाथ पकडली
click2ashti-बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे.
आष्टी येथील महावितरण विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजूर (फंड रिलीज) करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले तसेच अधिकारी खरसाडे, बीडकर आणि पुरी यांनी सहभाग घेतला.सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.दरम्यान,बीड जिल्ह्यात वाढत्या लाचखोरीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.