व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ऑपरेशननंतर आरोपी डॉ.पटवा अतिदक्षता विभागात;अटकेसाठी पोलीस रुग्णालयात दाखल

अहिल्यानगरच्या रुग्णालयात उपचार सुरू;‘अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न होणार का?’चर्चेला उधाण-वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांची पुढील कारवाई

0

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेंद्र पटवा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र पटवा यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सध्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल आहेत. दरम्यान, त्यांना अटक करण्यासाठी आष्टी पोलिसांचे कर्मचारी रुग्णालयात गेले होते. मात्र, पटवा यांच्यावर नुकतेच ऑपरेशन झाले असून ते अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पोलिसांना पुढील कारवाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
या संदर्भात प्रकरणाचे तपास अधिकारी नंदकिशोर सवासे यांनी माहिती देताना सांगितले की,आरोपी पटवा यांचे कालच ऑपरेशन झाले आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना आणखी तीन ते चार दिवस उपचाराची आवश्यकता आहे. त्यानंतर वैद्यकीय परिस्थितीनुसार आरोपीला अटक करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
अटकेसाठी पोलीस रुग्णालयात
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.त्यासाठी पोलीस कर्मचारी अहिल्यानगर येथील रुग्णालयात गेले होते.मात्र,आरोपी अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने आणि नुकतेच त्यांचे ऑपरेशन झाल्याने वैद्यकीय कारणास्तव तत्काळ अटक करणे शक्य झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.डॉक्टरांनी आणखी तीन ते चार दिवस उपचाराची आवश्यकता असल्याचे सांगितल्याने आता या कालावधीनंतर पोलिसांकडून आरोपीवर अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
‘तोपर्यंत रुग्णालयातच उपचार सुरू राहणार का?’
दरम्यान,आरोपीच्या उपचाराचा कालावधी वाढल्याने या प्रकरणात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.आरोपी पटवा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न करणार का? वैद्यकीय कारणामुळे आणखी काही दिवस रुग्णालयातच उपचार सुरू राहणार का? तसेच डॉक्टरांकडून वैद्यकीयदृष्ट्या फिट घोषित झाल्यानंतर पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, आरोपी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणार आहेत किंवा उपचार जाणूनबुजून लांबवले जात आहेत,अशी कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही.त्यामुळे या शक्यतांबाबत केवळ चर्चा सुरू असून, पुढील निर्णय न्यायालयीन आणि वैद्यकीय प्रक्रियेनुसारच होणार आहे.
कडा प्रकरणात आधीच मोठी खळबळ
दरम्यान,या प्रकरणामुळे कडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आष्टी पोलिसांनी डॉ. महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत ‘पटवा, हटवा’ अशी मागणी करत कडा शहर बंद ठेवले होते.यानंतर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळानेही डॉ. महेंद्र पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता आरोपी रुग्णालयातून डिस्चार्ज कधी होणार,वैद्यकीयदृष्ट्या त्यांची प्रकृती कधी स्थिर होणार आणि त्यानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई कशी केली जाणार,याकडे कडा तसेच आष्टी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.