व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची आ.सुरेश धस यांनी केली प्रत्यक्ष पाहणी;पाणी,चारा व पिकांच्या नुकसानीचा घेतला आढावा

पावसाने पाठ फिरवली;उभी पिके वाया,शेतकरी संकटात!

0

click2ashti- पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने आष्टी तालुक्यातील अनेक भागांत खरीप पिकांवर गंभीर संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेली उभी पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी आज गुरुवारी (दि.२४) तहसिलदार वैशाली पाटील,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी यांना थेट बांधावर घेऊन जात दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
आष्टी तालुक्यात आज गुरुवार (दि.२४)रोजी सकाळी ९ वा. मांडवा,वटणवाटी,खकाळवाडी परिसरातील शेतशिवारात पाहणी करताना पावसाअभावी करपलेली व सुकलेली पिके,जमिनीतील घटलेली ओल तसेच शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या विविध अडचणींचे विदारक चित्र आमदार धस यांच्या निदर्शनास आले.पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके धोक्यात आली असून,अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यावेळी आमदार धस यांनी शेतकरी व पशुपालक बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांची सद्यस्थिती,पाणीटंचाई,जनावरांसाठी चारा तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती घेतली.शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत तातडीच्या मदतीची आवश्यकता व्यक्त केली.राज्यातील अनेक भागांत पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नुकसानीचे मूल्यांकन आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. “दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व पशुपालक बांधवांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. परिस्थितीची गरज लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल,”असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या हातची उभी पिके डोळ्यादेखत वाया जात असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे,शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत,पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार धस यांच्या या पाहणीमुळे दुष्काळसदृश्य परिस्थितीने त्रस्त झालेल्या शेतकरी व पशुपालकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पाठपुराव्याला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.