व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘माझी विनाकारण बदनामी थांबवा’;प्राजक्ता धस यांचा माजी आमदार बाळासाहेब आजबेंना इशारा-जमीन व्यवहारांवरील आरोप फेटाळले

दुष्काळाने जनता होरपळतेय,अन् तुम्ही बदनामीच्या राजकारणात!

0

click2ashti-आष्टी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे हे आपली विनाकारण बदनामी करण्यात दंग असल्याचा आरोप महानंदच्या संचालिका प्राजक्ता सुरेश धस यांनी केला.व्यासपीठ कोणतेही असो,आमची बदनामी करण्याचे राजकारण तुम्हाला लखलाभ; मात्र माझी विनाकारण चाललेली बदनामी थांबवावी,असे आवाहनही त्यांनी केले.
आष्टी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्राजक्ता धस यांनी माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दुष्काळी मोर्चादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी सुवर्णाताई गिऱ्हे, शीतल कर्डिले आणि आशा करांडे उपस्थित होत्या.दुष्काळ,पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करताना वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांना प्राधान्य देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर आजबे यांनी केलेल्या आरोपांवर धस यांनी स्पष्टीकरण मांडले.आष्टी येथील सर्व्हे क्रमांक 176 आणि 177 या जमिनी पूर्वीपासून वर्ग-1च्या असून त्या खिदमतमास वर्गातील नसून मदतमाश वर्गातील होत्या. त्यामुळे त्यांची रीतसर खरेदी करण्यात आली असल्याचा दावा प्राजक्ता धस यांनी केला. या व्यवहाराबाबत कोणाचीही तक्रार नसल्याचेही त्यांनी सांगितले.राघापूर येथील जमिनीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, संबंधित जमिनीला कुळ असल्याचा दावा करणाऱ्यांकडे नियमाप्रमाणे आवश्यक असलेले 32-गचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचा कुळ म्हणून दावा सिद्ध होऊ शकलेला नाही.संबंधित जमीनही मालकांकडून रीतसर खरेदी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेले कागदपत्रे चुकीच्या संदर्भाने मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘वाळुंजला कार्यकर्त्याच्या फोनवरून गेले’
तवलवाडी आणि वाळुंज ही गावे जवळ असल्याचे सांगत प्राजक्ता धस म्हणाल्या की, वाळुंज येथील रघुनाथ पवार हे आपले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या फोनवरून आपण त्या ठिकाणी गेले होते. मात्र, या घटनेला वेगळे स्वरूप देत मोठे षडयंत्र रचण्यात आले आणि ते नंतर स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.
‘अदृश्य हातांमुळे आमदार झाल्याचा आरोप’
माजी आमदार आजबे यांच्या राजकीय टीकेलाही धस यांनी प्रत्युत्तर दिले.‘तुम्ही बाजारातून आला नाहीत,’असे म्हणता;मात्र तुम्ही अदृश्य हातांमुळेच आमदार झाला होता,असा आरोप त्यांनी केला.पाच वर्षांच्या कार्यकाळात स्वतःच्या प्रगतीत गुंतल्यामुळे अपेक्षित कामे झाली नाहीत आणि त्यामुळे पाच वर्षांत एक लाख मते अदृश्य झाल्याचा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावर आपण काहीही उत्तर दिलेले नाही आणि देऊही शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
‘महिलेचे नाव घेऊन बदनामी सहन करणार नाही’
दुष्काळी मोर्चामध्ये आपले नाव घेतले नसल्याचे आजबे म्हणत असतील, तर कोणत्याही महिलेचे नाव घेऊन तिची बदनामी केली जात असेल, तर ते आपण सहन करणार नाही, असा इशारा प्राजक्ता धस यांनी दिला.
दादेगाव देवस्थानच्या जमिनीचा मुद्दा ऐरणीवर
दादेगाव येथील रामचंद्र देवस्थान हे ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ असलेले देवस्थान असल्याचे सांगत प्राजक्ता धस यांनी देवस्थानच्या जमिनीच्या मुद्द्यावरही आजबे यांच्यावर पलटवार केला.त्यांच्या म्हणण्यानुसार, दादेगाव येथील श्री प्रभू रामचंद्र आणि मारुती मंदिराला ऐतिहासिक धार्मिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवस्थानच्या दिवाबत्तीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन दिल्याचा दावा करत त्या जमिनीच्या वापराबाबत आजबे यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.शिराळ गावातील शेतकरी शेकडो एकर देवस्थानची जमीन वापरत असून देवस्थानला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. चुकीच्या मार्गदर्शनामुळे संबंधित शेतकरी देवस्थानला देणगी देत नसल्याने मंदिरांची दुरावस्था झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
‘ट्रस्टी होण्यात आम्हाला रस नाही; मंदिराचा विकास हाच उद्देश’
दादेगाव देवस्थानच्या ट्रस्टीपदामध्ये आपल्याला कोणताही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट करत प्राजक्ता धस म्हणाल्या की, पुरातन मंदिरांचा विकास व्हावा, हा आपला उद्देश आहे. याच उद्देशाने ट्रस्टला मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याचा कोणाला राग येत असेल तर तो त्यांचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘अनिशा ग्लोबल शाळा आमच्या कुटुंबाची नाही’
बाळासाहेब आजबे यांच्या आरोपांमध्ये आणखी एक अज्ञान समोर आले असल्याचे सांगत प्राजक्ता धस यांनी पिंपळेश्वर देवस्थान संस्थानच्या मालकीच्या अनिशा ग्लोबल शाळेचा मुद्दाही उपस्थित केला. ही शाळा आपल्या कुटुंबाच्या मालकीची नसून पिंपळेश्वर देवस्थान संस्थानच्या मालकीची असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कोणतेही आरोप करण्यापूर्वी संबंधितांनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘अब्रुनुकसानीचा दावा केला तर स्वागतच’
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपल्याविरोधात केलेले आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान देतानाच त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची भूमिका घेतल्यास त्याचे आपण स्वागतच करू, असे प्राजक्ता धस यांनी शेवटी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.