सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री;अजित पवारांचे स्वप्न साकार होणार?
click2ashti-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री खा.सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राज्य सरकारने अधिकृतपणे सोपवली आहे.
चार दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बीडचे पालकतत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात होते. धनंजय मुंडे मंत्री झाल्यास तेच पालकमंत्री राहणार की भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार,यासह लातूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे नावही चर्चेत होते.अखेर मंगळवारी राज्य सरकारने बीड व पुणे या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिवंगत अजित पवार यांनी बीड जिल्ह्याला‘बारामतीच्या धर्तीवर विकसित करण्याचे’ स्वप्न पाहिले होते.पायाभूत सुविधा,सिंचन,रस्ते, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याचा त्यांचा संकल्प होता. आता त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न प्रत्यक्षात उतरते का,याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सुनेत्रा पवार यांच्या या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्याला थेट सत्ताकेंद्राशी जोडणारा दुवा मिळाला असून, विकासकामांना गती मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.