व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीचा सुपुत्र प्रथम घोडके यांची वयाच्या २४ व्या वर्षी कृषी उपसंचालक पदी निवड

एमपीएससी परीक्षेत दैदीप्यमान यश;घोडके कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव

0

click2ashti-शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत नगरसेवक बाळासाहेब घोडके यांचे चिरंजीव प्रथम बाळासाहेब घोडके यांनी अवघ्या २४ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.प्रथम यांची कृषी उपसंचालक (वर्ग-१)पदी निवड झाली असून,त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण आष्टी तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अत्यंत चुरशीची आणि स्पर्धात्मक समजली जाणारी एमपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे ही मोठी कामगिरी मानली जाते. प्रथम यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्पष्ट ध्येय याच्या जोरावर हे यश मिळवून आपल्या गुणवत्तेची प्रचिती दिली आहे.प्रथम यांचे बालपण सामाजिक व राजकीय वातावरणात गेले. वडील नगरसेवक असल्याने समाजकार्यातील जाण आणि जबाबदारीची भावना त्यांच्यात लहानपणापासूनच रुजली.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न,पाण्याची टंचाई,बदलते हवामान,पीकविमा आणि बाजारपेठेतील चढ-उतार या समस्यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला.याच जाणिवेतून त्यांनी प्रशासकीय सेवेत जाऊन थेट शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी काम करण्याचा निर्धार केला.कृषी विभागाची निवड ही केवळ करिअरची संधी नसून समाजसेवेचे माध्यम असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध नियोजन
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रथम यांनी वेळेचे काटेकोर नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यावर भर दिला. मोबाईल आणि इतर विचलनांपासून दूर राहून त्यांनी अभ्यासाला पूर्ण वेळ दिला.अपयशाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली असून,”मेहनत आणि योग्य दिशा असेल तर कोणतीही स्पर्धा कठीण नाही,”हा संदेश त्यांनी दिला आहे.
कुटुंबाचा अभिमानाचा क्षण
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना नगरसेवक बाळासाहेब घोडके म्हणाले,”प्रथम चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.आम्ही जपलेला समाजसेवेचा वारसा तो आता प्रशासकीय अधिकारी म्हणून अधिक व्यापक पातळीवर पुढे नेईल, याचा आम्हाला अभिमान आहे.”घोडके कुटुंबावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत असून,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रथम यांचे कौतुक केले.
ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श
अवघ्या २४ व्या वर्षी वर्ग-१ पदावर निवड होणे ही केवळ वैयक्तिक यशकथा नसून आष्टी तालुक्याच्या तरुणांसाठी प्रेरणादायी घटना ठरली आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांनीही मोठी झेप घेऊ शकते, याचा ठोस पुरावा प्रथमेश यांनी दिला आहे.आष्टीच्या मातीतून घडलेला हा अधिकारी भविष्यात कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————————————

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.