कांद्याच्या शेतात अफूची बेकायदेशीर लागवड उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
click2ashti-जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कांद्याच्या शेतामध्ये अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली.या कारवाईत सुमारे २० किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे.या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून अधिक माहिती अशी,गोपनीय माहितीवरून छापा
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, पिंपळा (ता.आष्टी,जि.बीड) येथील शेतात अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,पोलीस हवालदार अशोक दुबाले,गोविंद राख,बबन सलगर,सुनील राठोड तसेच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भडके,तावरे आणि पोलीस कर्मचारी पैठणे यांनी संयुक्त पथक तयार करून रात्री ९.३० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कांद्याच्या पिकात अफूची झाडे आढळली
छापा टाकल्यानंतर आरोपी परसराम मोहन जगधने हा त्याच्या ताब्यातील शेतात कांद्याच्या पिकामध्ये अफूची झाडे लावून त्यांचे संवर्धन करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी अफूची बोंडे व फुले असलेली सुमारे २० किलो वजनाची झाडे जप्त केली. या झाडांची अंदाजे बाजारमूल्य ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी आरोपी परसराम जगधने याच्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ख) आणि १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नविनत काँवत (पोलीस अधीक्षक, बीड), सचिन पांडकर (अप्पर पोलीस अधीक्षक), हनपुडे पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी) आणि शिवाजी बंटेवाड (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचे आवाहन
बीड जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक ९२७०२४३२०० असा असून,नागरिकांनी अंमली पदार्थांची खरेदी, विक्री,साठवणूक किंवा वाहतूक याबाबत माहिती मिळाल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच एनडीपीएस कक्ष प्रमुख पोलीस निरीक्षक रत्नाकर घोळवे (मो. ८८८८८२४१००) यांच्याशीही संपर्क साधता येणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.अंमली पदार्थांविरोधातील कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.