व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

रब्बी हंगामातील‘ई-पीक पाहणी’नोंदणीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ;तहसिदार वैशाली पाटील

आष्टी तालुक्यात फक्त ५५.६९% नोंद पूर्ण

0

click2ashti-रब्बी हंगाम २०२५-२६ मधील पिकांची ‘ई-पीक पाहणी’ (Digital Crop Survey) मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी,असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
शासकीय आकडेवारीनुसार,आष्टी तालुक्यात रब्बी हंगामातील पीक नोंदणी अद्याप समाधानकारक झालेली नसून केवळ ५५.६९ टक्के क्षेत्राचीच नोंदणी पूर्ण झाली आहे.अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी, मोबाईल अॅपचा अभाव किंवा माहितीअभावी नोंदणीपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने ही मुदतवाढ दिली आहे.ई-पीक पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्याचा उपयोग विविध शासकीय योजनांमध्ये केला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी मदत, पीक विम्याच्या दाव्यांची पूर्तता,बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी सातबारावरील पीक नोंद,तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनांचा लाभ घेण्यासाठी अचूक पीक नोंदणी आवश्यक ठरते.ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे.त्यांनी आपल्या गावातील तलाठी, कृषी सहाय्यक किंवा डिजिटल सहाय्यक (Digital Assistant) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.सहाय्यक स्तरावरून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा अवधी उपलब्ध असून,शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“तालुक्यातील रब्बी हंगामाची पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास त्वरित संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यात पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळवताना अडचणी येणार नाहीत.
-वैशाली पाटील,तहसीलदार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.