निवृत्त नायब तहसीलदार साहेबराव चव्हाण यांचे निधन;आष्टी परिसरात शोककळा
click2ashti–येथील निवृत्त नायब तहसीलदार साहेबराव गणपत चव्हाण (वय ९२) यांचे शनिवारी(दि.२५)पहाटे ६.३५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे आष्टी परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
साहेबराव चव्हाण यांनी आपल्या प्रशासकीय सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि जनसेवेची भूमिका जपली. विशेषतः गोरगरीब व गरजू नागरिकांची कामे प्रामाणिकपणे मार्गी लावण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करू शकले. निवृत्तीनंतरही त्यांनी साधी, सरळ व ग्रामीण जीवनशैली जपली होती.त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि लोकाभिमुख वृत्तीमुळे ते परिसरात सर्वांना आपलेसे वाटत होते.ते माजी विभागीय कृषी आयुक्त सुनिल चव्हाण तसेच मुर्शदपूरचे माजी सरपंच संतोष चव्हाण यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज(शनिवार) सकाळी ११.०० वाजता ‘के.सी.फार्म’,जय भोले पेट्रोलियम पंपाच्या मागे,कासारी(ता.आष्टी)येथे करण्यात येणार आहे.
त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ,जनतेशी नाळ जुळलेला आणि साधेपणाचा आदर्श जपणारा प्रशासकीय अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.