व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आई-वडिलांना आधार नाही;सुसंस्कृत पिढी घडविण्याचे मोठे आव्हान-ह.भ.प.गणेश शिंदे

चार मुलांचा सांभाळ करणारे आई-वडीलच वृद्धापकाळात उपेक्षित; आष्टीत दशक्रिया विधीतून समाजाला दिला संदेश

0

click2ashti–आई-वडील आयुष्यभर कष्ट करून चार मुलांचा सांभाळ करतात, त्यांना वाढवतात,शिक्षण देतात आणि आयुष्य घडवतात.मात्र,तीच मुले वृद्धापकाळात आई-वडिलांच्या संगोपनासाठी पुढे येत नाहीत,ही आजच्या समाजातील अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक शोकांतिका असल्याचे प्रतिपादन व्याख्याते तथा प्रबोधनकार गणेश शिंदे यांनी केले.
येथील राज्याचे माजी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, मुर्शदपुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष चव्हाण यांचे वडील माजी नायब तहसीलदार कै.साहेबराव चव्हाण यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात बुधवारी (दि.२९) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात प्रवचनात ते बोलत होते.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,किशोर हंबर्डे,राजेंद्र धोंडे,आण्णासाहेब चौधरी,सय्यद अल्लाउद्दीन,सतिष शिंदे,शरद भाऊ पवार,नामदेव राऊत,काकासाहेब शिंदे, संजय मेहेर,अमरराजे निंबाळकर,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे,पत्रकार उत्तम बोडखे,अमोलराजे तरटे,गणेश दळवी,शशिकांत डोमकावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात दिवंगत साहेबराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले की, शसध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा असून, एआयच्या माध्यमातून माणसाला अनेक प्रकारचा आधार आणि सुविधा मिळत आहेत.मात्र,या सर्व प्रगतीच्या काळातही माणूस आपल्या मूलभूत कर्तव्यांपासून दूर जात आहे. ज्यांनी जन्म दिला, वाढवले, त्यांच्याच आधारासाठी पोटची मुले पुढे येत नाहीत, ही बाब समाजाच्या अध:पतनाचे लक्षण आहे.ते पुढे म्हणाले की,आज धन, दौलत,संपत्ती याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे; पण माणुसकी, संस्कार आणि कुटुंबव्यवस्था यांचा ऱ्हास होताना दिसत आहे.त्यामुळेच सुसंस्कृत पिढी घडविणे हे काळाचे मोठे आव्हान बनले आहे. मुलांना लहानपणापासूनच आई-वडिलांविषयी आदर,कर्तव्यभावना आणि सामाजिक मूल्ये यांचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे.समाजातील वाढत्या या प्रवृत्तीवर वेळीच अंकुश ठेवला नाही,तर कुटुंबव्यवस्था ढासळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दिवंगत साहेबराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या कार्यक्रमास परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार संतोष चव्हाण यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.