सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाचा विश्वास;अँड.रिजवान शेख यांची आहिल्यानगर जिल्हा प्रभारीपदी निवड
click2ashti-राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने युवक संघटनेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत अहिल्यानगर शहर तथा अहिल्यानगर जिल्हा प्रभारीपदी अँड. रिजवान कादर शेख यांची नियुक्ती केली आहे. एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने दाखविलेल्या विश्वासामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
पक्षाच्या या निर्णयाबद्दल अँड.रिजवान शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार,प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.निवडीबद्दल बोलताना अँड.शेख म्हणाले की,पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्यावर दाखविलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. पक्षाची विचारधारा, युवकांचे प्रश्न आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा प्रयत्न राहील.युवकांना संघटनेशी जोडून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विशेष भर दिला जाईल,असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्याने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, मजबूत व प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते आणि कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो,”या विचाराने प्रेरित होऊन युवकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासह पक्षाची भूमिका तळागाळातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले जाईल,अशी ग्वाहीही अँड. शेख यांनी दिली.अँड. रिजवान शेख यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवसंजीवनी मिळणार असून युवकांमध्ये पक्षाचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होईल,असा विश्वास पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.