‘रानभाज्यांमध्ये आरोग्याचा खजिना;त्यांचे संवर्धन व आहारातील वापर वाढविणे गरजेचे’-तंत्र अधिकारी कानिफनाथ मरकड
रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित;आष्टीत रानभाजी महोत्सव उत्साहात
click2qshti-“रानभाज्या या आपल्या पारंपरिक आहाराचा महत्त्वपूर्ण भाग असून त्यामध्ये विविध औषधी व पोषणमूल्ये दडलेली आहेत. रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असून, बदलत्या जीवनशैलीच्या काळात या पारंपरिक व नैसर्गिक अन्नसंपदेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे रानभाज्यांना आपण अधिक महत्त्व देऊन त्यांचे संवर्धन व आहारातील वापर वाढविणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील तंत्र अधिकारी (फलोत्पादन) कानिफनाथ मरकड यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आष्टी येथे गुरुवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मरकड बोलत होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिक, शेतकरी तसेच कृषी सखी आणि शेतकरी गटांना स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व, उपयोग तसेच संवर्धन याबाबत माहिती देण्यात आली.या रानभाज्यांमध्ये विविध पोषक घटक तसेच औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा आहारात योग्य पद्धतीने समावेश करण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतींचे योग्य प्रकारे संगोपन,संवर्धन आणि शाश्वत वापर करण्याची गरजही उपस्थितांना सांगण्यात आली.
पारंपरिक ज्ञान जपण्याची गरज
ग्रामीण भागात पूर्वीपासून आहारात वापरल्या जाणाऱ्या अनेक रानभाज्या आधुनिक जीवनशैलीमुळे हळूहळू दुर्लक्षित होत आहेत. मात्र, या रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि पारंपरिक महत्त्व लक्षात घेता पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचविणे आवश्यक आहे.रानभाज्यांची ओळख, उपलब्धता, स्वयंपाकातील उपयोग आणि त्यांचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कृषी विभागातील अधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, कृषी अधिकारी गोकुळ जाधव, राजेश पाटील यांच्यासह कृषी विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मंडळ कृषी अधिकारी खुटाळे, भापकर, सूर्यवंशी, जगदने, उपकृषी अधिकारी महेश बोरुडे, धस, आठरे, धनवडे, चव्हाण, आत्माचे बेग एम.आर. व राजेंद्र धोंडे तसेच कृषी विभागातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.तसेच नैसर्गिक शेती अभियानातील कृषी सखी, विविध शेतकरी गट आणि आष्टी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाले. रानभाज्यांच्या प्रदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महाराष्ट्र शासन आत्मा यंत्रणा व कृषी विभाग, तालुका आष्टी,जिल्हा बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे रानभाज्यांचे पारंपरिक महत्त्व,त्यातील पोषणमूल्ये आणि स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.
३० प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन
महोत्सवात परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते.यामध्ये तांदुळजा,माठ,आळू,हादगा फुले,करटोली,अंबाडी,गुळवेल,बांबू,पाथरी,कुंजीर,शेवगा,उंबर, कपाळकोडी,भुईआवळा,केना,पानाचा ओवा,आघाडा,पिंपळ, फांद्यांची भाजी,टाकळा,कुरडू,कवठ,चिघळ,शेवग्याची पाने यांसह तब्बल ३० प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या.