व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

डॉ.महेंद्र पटवांना कडा डॉक्टर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित

गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा निर्णय;नागरिकांमधील नाराजी व संतापाची दखल घेत कारवाई

0

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र रसिकलाल पटवा यांच्याविरोधात आलेल्या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.डॉ.महेंद्र पटवा यांना असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आल्याचे अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पंडित खिल्लारे आणि सचिव डॉ. संदिश देशमुख यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.या पत्रामुळे कडा परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
गंभीर तक्रारीची असोसिएशनने घेतली दखल,असोसिएशनने डॉ. महेंद्र रसिकलाल पटवा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्याबाबत आलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तसेच संबंधित प्रकरणामुळे कडा शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली तीव्र नाराजी व संतापाची भावना असोसिएशनच्या निदर्शनास आली आहे.या पार्श्वभूमीवर कडा डॉक्टर असोसिएशनमधील सर्व सदस्यांचा विचार घेऊन डॉ. पटवा यांना उपाध्यक्षपदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘पटवा हटवा’च्या मागणीनंतर कारवाईला वेग
कडा येथील १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेंद्र पटवा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले.आष्टी पोलिस ठाण्यात या प्रकरणी BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर कडा शहरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.‘पटवा, हटवा’ अशी मागणी करत नागरिकांनी शहर बंद ठेवून संबंधित पदांवरून डॉ.पटवा यांना हटविण्याची मागणी केली होती.
यानंतर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळानेही डॉ.पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. आता कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशननेही उपाध्यक्षपदावरून निलंबित केल्याने पटवा यांच्याविरोधातील कारवाईची मालिका पुढे सुरू असल्याचे चित्र आहे.
पोलिस तपासाकडे लक्ष
दरम्यान,या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र पटवा सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.त्यांच्यावर नुकतेच ऑपरेशन झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस उपचार आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.आता एकीकडे डॉक्टर असोसिएशन आणि शैक्षणिक संस्थेकडून झालेली कारवाई, तर दुसरीकडे पोलिस तपास आणि आरोपीच्या अटकेची प्रक्रिया यामुळे कडा येथील या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,असोसिएशनने निलंबनाचा निर्णय घेतला असला तरी पोलिसांत दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे,हेही महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.