केवायसीअभावी ३,१७८ शेतकरी अद्याप लाभापासून वंचित;केवायसी पूर्ण करण्याचे सहाय्यक निबंधक पूजा सांगळे यांचे आवाहन
आष्टी तालुक्यात ९,४६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा
click2ashti-राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण १२ हजार ६४१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी ९ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.मात्र, अद्याप ३ हजार १७८ शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने हे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.आष्टी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात कर्जमाफी योजनेबाबत माहिती देताना सहाय्यक निबंधक पूजा सांगळे यांनी सांगितले की,राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना लागू केली आहे.या योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया करण्यात आली आहे.त्यापैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे
मात्र,काही शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांच्या कर्जमाफीची रक्कम वर्ग होऊ शकलेली नाही. तालुक्यातील ३ हजार १७८ शेतकरी या कारणामुळे लाभापासून अद्याप दूर आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन पूजा सांगळे यांनी केले आहे.कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झाल्याने हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून,आता केवायसी प्रलंबित असलेल्या ३ हजार १७८ शेतकऱ्यांनीही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
९,४६३ शेतकऱ्यांना मिळाला लाभ
आष्टी तालुक्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १२ हजार ६४१ शेतकऱ्यांपैकी ९ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांपैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.उर्वरित शेतकऱ्यांनीही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही केवायसी पूर्ण न झाल्याने लाभ मिळालेला नसलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक अथवा आवश्यक ठिकाणी संपर्क साधून आपली केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक पूजा सांगळे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे व केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.