व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘रडायचे नाही,लढायचे!’दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र या;अडचण आल्यास शेवटचा पर्याय म्हणून मला फोन करा!

आमदार सुरेश धस यांचे मायंबा मच्छिंद्रनाथ गडावरील दसरा मेळाव्यात आवाहन; ४५० कोटींचा मंदिर विकास आराखडा, मतदारसंघात ४ रेडक्रॉस व १३ नमो दवाखाने सुरू होणार

0

click2ashti-येणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाण्याची बचत करा, अनावश्यक खर्च टाळा आणि संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहा. यावेळी आपल्याला रडायचे नाही,तर लढायचे आहे.शेतकऱ्यांसह कोणालाही कोणतीही अडचण आली,तर शेवटचा पर्याय म्हणून फक्त सुरेश धस यांना फोन लावा. तुमची अडचण दूर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार,अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मायंबा मच्छिंद्रनाथ गडावर विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्य सुविधा आणि मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.मेळाव्याला मान्यवरांची उपस्थिती
या दसरा मेळाव्याला माजी आमदार साहेबराव दरेकर,बाळू महाराज गिरगावकर,मंदार महाराज शास्त्री,रामकृष्ण महाराज,रुईदास महाराज गर्जे,भागवत महाराज उंबरेकर,सुवर्णा गिरी,कल्याण महाराज कोल्हे, अशोक महाराज भोसले,लक्ष्मण महाराज सस्ते,नाथ गायक,आकाश शिंदे,महाराष्ट्र सरपंच परिषद अध्यक्ष दत्ता काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर,भाविक आणि नागरिक उपस्थित होते.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश,शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासाचा संकल्प यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दुष्काळाशी लढण्यासाठी पाणी आणि पैशांची बचत करा!
यंदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य विनियोग करणे आवश्यक आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी खचून न जाता या संकटाचा एकजुटीने सामना करावा.अडचणीच्या काळात मदतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू,असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला.
मच्छिंद्रनाथ गडासाठी ४५० कोटींचा विकास आराखडा
मच्छिंद्रनाथ गडावरील दसरा मेळाव्याच्या परंपरेचा उल्लेख करताना आमदार धस म्हणाले की, सन २००८ पासून या मेळाव्याची सुरुवात झाली असून,यंदा मेळाव्याचे १८ वे वर्ष आहे.आपण १९९७ पासून गडावर येत आहोत.या देवस्थानचे ट्रस्ट २००७ मध्ये स्थापन झाले. मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार नसताना या काळात गडासाठी निधी मिळाला नाही.मात्र,पुन्हा आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.सध्या मंदिराचा विकास आराखडा किमान ४५० कोटी रुपयांचा असल्याचे त्यांनी सांगितले.मच्छिंद्रनाथ गडाचे महत्त्व केवळ दोन जिल्ह्यांपुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण भारतभर पोहोचले पाहिजे. या तीर्थक्षेत्राची महती देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मतदारसंघात ४ रेडक्रॉस आणि १३ नमो दवाखाने
आरोग्य सुविधांबाबत माहिती देताना आमदार धस म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी मतदारसंघात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतरही रुग्णांना मदत करण्याचे काम सुरू आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत, यासाठी आष्टी, कडा, पाटोदा आणि शिरूर येथे चार रेडक्रॉस दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमध्ये रुग्णांना उपचारासाठी होणाऱ्या एकूण खर्चापैकी केवळ २५ टक्के खर्च करावा लागेल, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एक याप्रमाणे १३ नमो दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या आरोग्य सुविधांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुढील वर्षी दसरा मेळावा संध्याकाळी होणार
दसरा मेळाव्याच्या वेळेबाबत बोलताना आमदार धस यांनी पुढील वर्षापासून मेळावा एक दिवस आधी आयोजित करण्याचा तसेच संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत घेण्याचा मानस व्यक्त केला. सणासुदीच्या दिवशी नागरिकांना विविध कामे असतात. त्यामुळे भाविकांना मेळाव्यात सहभागी होणे सोयीचे व्हावे, यासाठी वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार धस यांच्या प्रयत्नांमुळे गडाचा कायापालट-दरेकर
यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्रनाथ गडाकडे आमदार सुरेश धस यांनी विशेष लक्ष दिल्यापासून गडाचा कायापालट झाला आहे.सध्या दुष्काळाचे सावट असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.अशा परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.