व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शाळेजवळ स्टिंग विक्रीवर बंदी;आष्टीत पोलिसांकडून वसुलीचा आरोप? घटनेची चौकशी करण्याची मागणी

0

click2ashti-राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न भेसळ, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला वेग आला आहे.विशेषतः शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंगसह तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर येत असून,आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील एका घटनेमुळे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ब्रम्हगाव येथील श्रृगेंरी विद्यालय परिसरातील एका किराणा दुकानात स्टिंग विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणात संबंधित दुकानदाराकडून पोलिसांनी कारवाईची भीती दाखवत पाच हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या कथित प्रकारामुळे व्यापारी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, नियमांची अंमलबजावणी की आर्थिक वसुली,असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते,शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्य लक्षात घेता अशा विक्रीवर कठोर निर्बंध असावेत, याबाबत कोणाचेही दुमत नाही.मात्र कायद्याच्या नावाखाली कोणत्याही व्यापाऱ्याची आर्थिक पिळवणूक होत असेल,तर त्याचीही निष्पक्ष चौकशी होणे तेवढेच आवश्यक आहे.या कथित घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित विभागाने सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी,अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गातून होत आहे.जर संबंधित आरोपांमध्ये तथ्य आढळले,तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी,अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,या प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले,याबाबत योग्य ती चौकशी करून जर कुणी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले असतील तर त्याचावर कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.