व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासकामांना वेग;उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय आढावा बैठक

0

click2ashti-आष्टी तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज (दि. ९ जुलै) आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत गडावरील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन विविध कामांना गती देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत भक्तनिवासाचे बांधकाम, प्रसादालय उभारणी, आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, मंदिराचा जीर्णोद्धार, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, परिसर सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी प्रत्येक विकासकामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत सर्व कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा विकास धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून व्हावा, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.आमदार सुरेश धस यांनी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत, भाविकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले. विकासकामे जलदगतीने पूर्ण करून गडाचे वैभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.बैठकीस उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख,खासदार बजरंग सोनवणे,आमदार प्रकाश सोळंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुनील चव्हाण, कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ,वास्तुविशारद हेमंत पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीमुळे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासकामांना नवी गती मिळणार असून, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून गडाला धार्मिक पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.