व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासकामांची आ.सुरेश धस व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची पाहणी

मंदिर जीर्णोद्धारासह सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना; भाविकांसाठी आधुनिक सुविधांवर भर

0

click2ashti-तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धार व विविध विकासकामांची सोमवारी (दि.१३ जुलै) आमदार सुरेश धस आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.गडावरील भव्य मंदिराच्या जीर्णोद्धारासह विविध विकासकामांची प्रगती, गुणवत्ता आणि नियोजनाची माहिती संबंधित अधिकारी व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
यावेळी आमदार सुरेश धस यांनी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा धार्मिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत सर्व विकासकामे उच्च दर्जाची,टिकाऊ आणि भाविकांच्या सोयीसाठी उपयुक्त पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.पाहणीदरम्यान गडावर सुरू असलेल्या मंदिराच्या भव्य-दिव्य जीर्णोद्धारासह परिसर सुशोभीकरण, भाविकांसाठी मूलभूत सुविधा,रस्ते,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नदान छत्र,स्वच्छता तसेच इतर विकासकामांची सविस्तर माहिती घेण्यात आली.आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गडावर पाहणी करतांना जिल्हाधिकारी व आमदार धस दिसत आहेत.

विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही,याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही विविध विकासकामांची बारकाईने पाहणी करत कामांच्या गुणवत्तेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामांमुळे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा विकास अधिक गतिमान होईल आणि भाविकांना आधुनिक सुविधांसह अधिक समृद्ध धार्मिक अनुभव मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील,श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड ट्रस्टचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,विश्वस्त,विविध विभागांचे अधिकारी,पदाधिकारी,पत्रकार तसेच स्थानिक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.